पब्जी खेळा... बक्षीस मिळवा! नेमकी कुठे आणि काय आहे ही स्पर्धा. वाचा संपूर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

टेकफेस्टच्या इतिहासात अशी स्पर्धा प्रथमच होत आहे.

मुंबई : आजची तरुणाई ऑनलाईन गेमिंगमध्ये रमत चालली आहे; मात्र ऑनलाईन गेम खेळतानाच पैसे कमवण्याबरोबरच करिअरच्या संधीही आहेत. तरुणांना त्याची जाणीव करून देण्यासाठी यंदा आयआयटी मुंबई टेकफेस्टमध्ये पब्जी-मोबाईल कॉम्पिटिशन घेण्यात येणार आहे. टेकफेस्टच्या इतिहासात अशी स्पर्धा प्रथमच होत आहे. 3 ते 5 जानेवारीदरम्यान होणाऱ्या टेकफेस्टमध्ये स्पर्धेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञान विकास करण्याच्या क्षमतेला चालना मिळावी, यासाठी 1998 मध्ये प्रथमच आयआयटी मुंबईमध्ये "टेकफेस्ट' सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या संशोधनशक्तीला मिळणारी चालना, विविध कल्पना, स्पर्धा आदींमुळे अल्पावधीतच "टेकफेस्ट' आशियातील सर्वात मोठा विज्ञान व तंत्रज्ञान महोत्सव म्हणून ओळखला जाऊ लागला.

आशियातील सर्वात मोठा असलेला आयआयटी टेकफेस्ट 3 ते 5 जानेवारीदरम्यान होत आहे. यंदाच्या टेकफेस्टचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यामध्ये गेमर्स लीगमध्ये लोकप्रिय पब्जीबरोबरच काही वर्षांपासून सीएस गो (काऊंटर स्ट्राईक) खेळणाऱ्यांचा सामनाही रंगणार आहे. दोन्ही खेळांतील विजेत्यांना दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. आतापर्यंत प्रत्येकी चार जणांच्या 256 संघांनी पब्जी मोबाईल ई स्पोर्टस्‌ स्पर्धेमध्ये नोंदणी केली आहे. 

करिअरचीही संधी 
"पब्जी'साठी नोंदणी करणाऱ्या संघांचे आपापसांत सामने होतील. त्यानंतर त्यातील सर्वोत्तम 16 संघांमध्ये 3 ते 5 जानेवारीदरम्यान टेकफेस्टमध्ये चुरस होईल. परदेशांतही तरुणाईला मोबाईल गेमिंगने भुरळ पाडली आहे; मात्र अशा गेम्सकडे करिअरची संधी म्हणून इतर देशांतील तरुणाई वापर करून घेत आहे. तोच धडा आपल्या तंत्रवेड्या तरुणाईने घेऊन करिअरचा एक उत्तम पर्याय म्हणून गेम्सकडे पाहण्याचा स्पर्धेचा उद्देश असल्याचे ई स्पोर्टस्‌ हेड प्रतीक मोहनानी याने स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Play PUBGY ... Earn rewards!