Rajinikanth Birthday: सुपरस्टार रजनीकांत यांचे सत्तरीत पदार्पण 

वृत्तसंस्था
Saturday, 12 December 2020

रजनीकांत हे आज (शनिवारी) ७० वर्षांचे होणार आहेत.तमिळनाडूच्या राजकारणात उतरण्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली असल्याने आनंदित झालेले त्यांचे चाहते आज  त्यांचा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा करणार आहेत.

चेन्नई - सुपरस्टार रजनीकांत हे शनिवारी (ता. १२) ७० वर्षांचे होणार आहेत. तमिळनाडूच्या राजकारणात उतरण्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली असल्याने आनंदित झालेले त्यांचे चाहते आज  त्यांचा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा करणार आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रजनीकांत यांच्या ‘रजनी मक्कल मद्रम’ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात अन्नदान, रक्तदान शिबिर, गरजूंना कल्याणकारी वस्तूंचे वाटप यांचा समावेश आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फलक चेन्नईत सर्वत्र झळकत आहेत. रजनीकांत हे त्यांच्या वाढदिवसाला चेन्नईबाहेर असतात आणि त्यादिवशी निवासस्थानी न येण्याची विनंती ते चाहत्यांनी करीत असत. यंदा मात्र वाढदिवशी ते चेन्नईत आहेत. आवडत्या अभिनेत्याचे अभीष्टचिंतन करण्यासाठी चाहते त्यांच्या घरी भेट देण्याची शक्यता असल्याने परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यासाठी पोलिस तैनात केले असून बॅरिकेड उभारण्‍यात आले आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ बंधूची मंदिरात पूजा 
दरम्यान, रजनीकांत यांचे ज्येष्ठ बंधू सत्यनारायण यांनी भावासाठी मंदिरांमध्ये पूजा केली. ‘‘रजनीकांत यांच्यावर गुरुकृपा असून ते शब्दाला जागणारे आहेत. ते जे बोलतात ते निश्‍चितपणे करून दाखवतात,’’ अशी भावना सत्यनारायण यांनी व्यक्त केली. 

पदाधिकाऱ्यांबरोबर महत्त्वाची चर्चा 
राजकीय प्रवेशाआधी रजनीकांत हे त्यांच्या प्रस्तावित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत असून सलग तिसऱ्या दिवशी त्यांनी तमिळारुवी मनियन आणि अर्जुन मूर्ती यांच्याशी चर्चा केली. पोएस गार्डन येथे सकाळी झालेल्या या बैठकीत निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यासंदर्भात व नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth Birthday: Rajinikanth turns 70 on December 12