Martha Kranti Morcha: कुणबी दर्जा दिल्यास, तोडगा निघेल - रावसाहेब दानवे

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 August 2018

नवी दिल्ली - मराठवाडा हैदराबाद संस्थानात असताना मराठा समाजाचा समावेश कुणबी समाजात केला जायचा व त्यांना आरक्षणही मिळायचे. अशीच स्थिती विदर्भ व कोकणातही होती. जो दर्जा मराठ्यांना हैदराबाद संस्थानात होता तोच कुणबी दर्जा आता मिळाला, तर आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा निघेल व राज्य सरकार हाच मुद्दा न्यायालयात मांडेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज दिल्लीत व्यक्त केले.

हैदराबाद संस्थानात असताना निजामाने मराठ्यांचा समावेश कुणबी गटात करून त्यांना आरक्षण दिले होते. हीच तरतूद केली तर मराठा आरक्षणाचा मुद्दाच निकाली निघेल, असे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर मराठवाड्यातील कुणबी मराठे झाले व त्यांचा आरक्षणाचा हक्क हिरावला गेला. भाजप सरकार तो पुन्हा मिळवून देण्यास प्रयत्नशील आहे.

दानवे म्हणाले, 'आरक्षणाच्या बाजूने मराठा समाजाने अत्यंत शिस्तबद्धपणे 58 मोर्चे काढले. हे मोर्चे हे रोल मॉडेल बनले. मात्र ताज्या आंदोलनात मराठा समाजाच्या व्यतिरिक्त प्रवृत्ती आंदोलनात शिरल्या व हिंसाचार सुरू झाला. मराठा समाज हा शांतताप्रिय असून, तो हिंसाचार करूच शकत नाही. त्यामुळे माझे आंदोलकांना आवाहन आहे, की त्यांनी राज्य सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देऊन आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यास मदत केली पाहिजे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर आंदोलन करू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh raosaheb danve