आता कामाचे तास नऊ होणार! 

आता कामाचे तास नऊ होणार! 

मुंबई : देशातील सर्व कामगारांच्या कामाच्या तासांत मोठा बदल करण्याचा केंद्रीय कामगार मंत्रालयाचा विचार आहे. सध्या कामगारांसाठी आठ तासांची "शिफ्ट' असते, ती नऊ तासांवर नेण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने मांडला आहे. 1 नोव्हेंबर रोजी कामगार मंत्रालयाने वेतन (केंद्रीय) नियमविषयक प्राथमिक मसुदा जाहीर केला असून त्यात हे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. 

या प्रस्तावित वेतन नियमावली मसुद्यानुसार, यापुढे सर्वसाधारण कामाचा दिवस नऊ तासांचा असेल. या प्रस्तावित नियमावलीत कामगाराची साप्ताहिक सुटी, रात्रपाळी यांचाही विचार करण्यात आला आहे. यानुसार एखाद्या कामगारास मध्यरात्रीनंतर कामावर थांबावे लागले, तर त्याची गणना रात्रपाळीत केली जाईल, असे म्हटले आहे. 

विशेष म्हणजे, वेतन नियमावलीविषयक या मसुद्यात राष्ट्रीय किमान वेतन नक्की करणे अपेक्षित असताना, नेमके तेच करण्यात आलेले नाही. त्याची जबाबदारी तज्ज्ञ समितीकडे ढकलण्यात आली आहे. मात्र संसदेने मंजूर केलेल्या आणि गेल्या ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेल्या "कोड ऑन वेज ऍक्‍ट- 2019'चा एक भाग म्हणून या मसुद्यात किमान वेतन ठरविण्याबाबतची नियमावली प्रस्तावित केली आहे. 
त्यानुसार, नोकरी करणारी व्यक्ती आणि तिच्यावर अवलंबून असलेला पती वा पत्नी आणि त्यांची दोन मुले अशा सर्वसाधारण कामगारवर्गातील कुटुंबात तीन प्रौढ खाती तोंडे (कन्झम्प्शन युनिट) असतील, असे मानण्यात येईल.

या व्यक्तीचा किमान वेतनदर ठरविताना यातील प्रत्येक घटकास दिवसाला 2700 कॅलरीज मिळतील, या कुटुंबाला वर्षाला 66 मीटर कापड मिळेल, त्यांच्या अन्न व वस्त्रावरील खर्चाच्या दहा टक्के एवढी रक्कम त्यांना घरभाडे म्हणून मिळेल, तसेच त्यांच्या किमान वेतनाच्या 20 टक्के रक्कम इंधन, वीज आणि अन्य खर्चासाठी, तर 25 टक्के रक्कम मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, मनोरंजन आणि अन्य आपत्कालीन बाबींसाठी उपलब्ध होईल, याचा विचार करण्यात यावा, असे सुचविण्यात आले आहे.

एकदा दिवसाचा हा वेतनदर नक्की झाला, की मग एक तासाचा वेतनदर निश्‍चित करण्यासाठी त्या रकमेला आठने भागावे आणि महिन्याचा वेतनदर नक्की करण्यासाठी 26 ने गुणावे, असे या प्रस्तावित नियमावलीत म्हटले आहे. कामाचे तास नऊ करावेत, असे सुचविणाऱ्या या नियमावलीत, प्रतितास किमान वेतनदर नक्की करण्यासाठी आठने भागावे, असे म्हटले आहे. 

या प्रस्तावांवर नागरिकांना या महिनाअखेरपर्यंत प्रतिक्रिया वा आक्षेप नोंदविता येतील, असे केंद्रीय कामगार मंत्रालयातील सहायक संचालक बिकाशकुमार मलिक यांनी कळविले आहे. 

web title : now Work hours will be nine 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com