काश्‍मीरमधून पर्यटक सुखरूप परत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले.

मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर पर्यटक मिळेल त्या विमानाने परतीचा प्रवास करत आहेत. अमरनाथ यात्रेवर गेलेले 40 भाविक शुक्रवारी रात्री परत आले, असे चौधरी यात्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बारडे यांनी सांगितले. केसरी टूर्सतर्फे अमरनाथ यात्रेवर गेलेले 40 जण रविवारपर्यंत परत येतील, अशी माहिती संचालक शैलेश पाटील यांनी दिली. कंपनीचे 30 कर्मचारी सहकुटुंब काश्‍मीरला गेले होते; त्यांनाही परत बोलावले आहे, असे ते म्हणाले. ऑगस्टमध्ये रद्द झालेल्या सहली सप्टेंबरमध्ये आयोजित करण्याचा विचार आहे. त्यामुळे पर्यटकांच्या हवाई प्रवासाची तिकिटे रद्द न करता पुढील सहलीसाठी आरक्षित करण्याबाबत विमान कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्‍मीरमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये पर्यटनाचा हंगाम नसतो; त्यामुळे अत्यंत कमी पर्यटक तेथे जातात. केंद्र सरकारच्या धोरणानुसार जम्मू-काश्‍मीरच्या सहलींचे नियोजन करण्यात येईल, असे राजा-राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्‍वजीत पाटील म्हणाले. पर्यटकांना परत येण्यासाठी अतिरिक्त विमान सेवा देण्याची मागणी पर्यटन कंपन्यांनी केली आहे. सोनमर्ग, गुलमर्ग, श्रीनगर येथे पर्यटकांची संख्या जास्त आहे. 

हॉटेलमालकांत नाराजी 
सरकारच्या आदेशानंतर पर्यटक खूप घाबरले आहेत. तुम्हाला काहीही होऊ देणार नाही; तुम्ही आमच्याकडे सुरक्षित आहात, असा दिलासा त्यांना देत आहोत, असे हाऊसबोटचे मालक मंजूर कोथरूल यांनी सांगितले. आमच्याकडील सर्व पर्यटक पहाटे 3 वाजता हाऊसबोट सोडून विमानतळावर गेले. सरकारच्या या धोरणामुळे आमच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे, असे ते म्हणाले. 
काश्‍मीरमध्ये मुंबईहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथील परिस्थिती ठीक आहे; पण सरकारच्या आदेशामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. "हम सब एक है' या भावनेने आम्ही पर्यटकांचे आदरातिथ्य करतो, तरी सरकार असे का वागते, तेच कळत नाही. पर्यटक आले नाहीत, तर आम्ही कसे जगायचे, असा प्रश्‍न अकबर इन हॉटेलचे मालक मुझफर अहमद यांनी केला. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये सध्या एकूण किती पर्यटक आहेत, याचा अंदाज नाही. पर्यटकांना राज्याबाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षित रस्त्यांवरून विमानतळावर पोहोचवले जात आहे. विमानतळापर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे. 
- निसार वाणी, संचालक, जम्मू-काश्‍मीर पर्यटन विकास मंडळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists return freely from Kashmir