रेल्वेचे ऑनलाइन आरक्षण आजपासून महाग 

पीटीआय
Sunday, 1 September 2019

- आयआरसीटीसीकडून ऑनलाइन आरक्षण करणे महाग होणार
- भारतीय रेल्वेने एक सप्टेंबरपासून ऑनलाइनवर आरक्षणावर सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
-  सामान्य श्रेणीसाठी 15; तर वातानुकूलितसाठी 30 रुपये सेवाशुल्क 
- सेवाशुल्काव्यतिरिक्त माल आणि सेवाकर (जीएसटी) वेगळे असणार आहे. 

नवी दिल्ली : आयआरसीटीसीकडून ऑनलाइन आरक्षण करणे महाग होणार आहे. भारतीय रेल्वेने एक सप्टेंबरपासून ऑनलाइनवर आरक्षणावर सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 30 ऑगस्टच्या आयआरसीटीसीच्या आदेशानुसार सामान्य श्रेणीतील प्रत्येक ई-तिकीटवर 15 रुपये; तर प्रथम श्रेणीसह वातानुकूलित श्रेणीतील सर्व ई-तिकिटावर 30 रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. सेवाशुल्काव्यतिरिक्त माल आणि सेवाकर (जीएसटी) वेगळे असणार आहे. 

तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या निर्णयानंतर नरेंद्र मोदी सरकारने डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे आरक्षणावरील सेवाशुल्क मागे घेतले होते. या निर्णयामुळे काही प्रमाणात ई-तिकीटची लोकप्रियता वाढली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, दररोजच्या आरक्षणात ई-तिकीटची भागीदारी सुमारे 55 ते 60 टक्के आहे. 2016 मध्ये हीच भागीदारी 35 ते 40 टक्के होती. रे

रेल्वेकडील माहितीनुसार देशात दररोज सुमारे 11 ते 12 लाख आरक्षण तिकीट जारी केले जातात. पूर्वी आयआरसीटीसीच्या बिगर वातानुकूलित श्रेणीच्या ई-तिकिटाला 20 रुपये आणि सर्व वातानुकूलित श्रेणीतील ई-तिकिटांना 40 रुपये सेवाशुल्क आकारत होते. याच महिन्यात प्रारंभी रेल्वे मंडळाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझमच्या (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकिटावर आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काला मंजुरी दिली होती. 2016-17 या आर्थिक वर्षात सेवाशुल्क रद्द केल्यानंतर आयआरसीटीच्या महसुलात 26 टक्के घट झाली होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online train reservation expensive from today