
धोलेरात ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणार
नवी दिल्ली - गुजरातमधील धोलेरा येथे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. यासाठी गुजरातमध्ये १५०१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. धोलेरा इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी लिमिटेडद्वारे हे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित केले जाणार असून या प्रकल्पावर १३०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी निर्णयाची माहिती दिली. धोलेरा येथील ग्रीनफिल्ड विमानतळ २०२५-२५ मध्ये विमानतळ कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. धोलेरा विमानतळासाठी लागणाऱ्या निधीमध्ये ५१ टक्के भाग भांडवल भारत सरकारच्या एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाचे असेल. तर गुजरात सरकारची हिस्सेदारी ३३ टक्के आणि नॅशनल इंडस्ट्रिअल कॉरिडॉर डेव्हलपमेन्ट ट्रस्टची हिस्सेदारी १६ टक्के असेल.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर
दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये आठ टप्पे उभारले जाणार आहे. त्यातील एक टप्पा म्हणजे धोलेरा येथील विमानतळ असून अहमदाबादचे दुसरे विमानतळ म्हणूनही धोलेरा ओळखले जाईल, असा दावा अनुराग ठाकूर यांनी केला. हे विमानतळ वाहतुकीच्या वेगवेगळ्या मार्गांनी जोडले जाणार आहे. तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील अधिकृत संस्थांदरम्यान तरुणांसाठीच्या कार्यातील सहकार्य कराराला मंजुरी दिली.
Web Title: धोलेरात ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणार केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली Greenfield Airport To Be Set Up In Dholera
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..