आता गोवाही काँग्रेसच्या 'हाता'तून जाणार?

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात असतानाच आज कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी हाताची साथ सोडली.

पणजी : गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात असतानाच आज कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी हाताची साथ सोडली. ते रात्री भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यानंतर काहींचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. गोव्याच्या राज्यपाल सध्या दिल्लीत असून, त्या तातडीने गोव्याच्या दिशेने निघाल्या आहेत. त्या मध्यरात्री गोव्यात पोचतील, त्यानंतर किंवा सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही फूट पडली असून, त्यांच्यासोबत आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, आतोनिओ फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, निळकंठ हळर्णकर, क्‍लाफासिओ डायस आणि विल्फेड डिसा हे आमदार आहेत. 

त्यामुळे कॉंग्रेसकडे प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत आणि आलेक्‍स रेजिनाल्ड हेच आमदार शिल्लक राहतील. त्यापैकी रेजिनाल्ड वगळल्यास इतर सर्व माजी मुख्यमंत्री आहेत. सभापती राजेश पाटणेकर हे डिचोलीहून पर्वरी विधानसभा संकुलात येण्यास निघाले आहेत. ते पोचल्यावर हा गट भाजपमध्ये विलीन केला जाणार आहे.

याआधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनाही भाजपने याच पद्धतीने प्रवेश देण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 Congress MLA Resigned in Goa