एअर इंडियाची धुरा इकार आयसींच्या खांद्यावर; वाचा नव्या CEO बद्दलच्या 10 गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एअर इंडियाची धुरा इल्केर आयजींच्या खांद्यावर; वाचा नव्या CEO बद्दलच्या 10 गोष्टी

एअर इंडियाची धुरा इल्केर आयजींच्या खांद्यावर; वाचा नव्या CEO बद्दलच्या 10 गोष्टी

नवी दिल्ली : तुर्की एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष इल्केर आयजी यांना एअर इंडियाचे (Air India) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय आज टाटा सन्सतर्फे घेण्यात आला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. संबंधित सरकारी नियामकांच्या परवानगीनंतर हा निर्णय अधिकृतपणे लागू होईल, असे टाटा सन्सतर्फे ई-मेलद्वारे प्रसारमाध्यमांना कळविण्यात आले आहे. (Ilker Ayci)

तुर्की एअरलाईन्सचे अध्यक्षपद सांभाळण्यापूर्वी इल्केर आयजी (Ilker Ayci) हे त्या एअरलाईन्सच्या संचालक मंडळावरही बराच काळ होते. इस्तंबूल तसेच इंग्लंडमधील विख्यात विद्यापीठांमधून उच्चशिक्षण घेतलेले आईसी हे एक एप्रिलपर्यंत एअर इंडियाच्या नव्या पदाची सूत्रे स्वीकारतील. टाटा समूहात प्रवेश करून विख्यात एअर इंडियाची सूत्रे स्वीकारणे हा मोठाच बहुमान आहे. एअर इंडियाच्या समृद्ध वारशाचा वापर करून कंपनीला जगातील सर्वोत्तम विमानसेवा बनविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांसह प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे आयजी (Ilker Ayci) यांनी सांगितले; तर तुर्की एअरलाईन्सला नव्या उंचीवर नेणारे आयजी हे एअर इंडियाला वेगळ्या युगात नेतील, असा विश्वास एन. चंद्रसेकरन यांनी व्यक्त केला.

1) याआधी इकार आयजी (Ilker Ayci) हे तुर्की एअरलाइन्सचे अध्यक्ष होते आणि त्यापूर्वी ते कंपनीच्या संचालक मंडळावर होते.

2) ते 2013 मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

3) आयजी हे पूर्वी 2011 मध्ये तुर्की रिपब्लिक ऑफ टर्की इन्व्हेस्टमेंट सपोर्ट अँड प्रमोशन एजन्सीचे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना तुर्की देशातील गुंतवणुकीच्या संधी काय आहेत, यासंदर्भातील माहिती देणारी ही अधिकृत संस्था आहे.

4) ते तुर्की फुटबॉल फेडरेशन आणि तुर्की एअरलाइन्स स्पोर्ट्स क्लबच्या बोर्डावर देखील आहेत.

5) 2005 ते 2006 दरम्यान, आयसी यांनी बासाक सिगोर्टा ए.एस. आणि त्यानंतर 2006 आणि 2011 दरम्यान गुनेस सिगोर्टा ए.एस.साठी सरव्यवस्थापक म्हणून काम केले.

6) 1994 मध्‍ये त्यांनी करिअरची सुरुवात केली. ते कुर्तसान इलाक्‍लारी ए.एस. आणि इस्‍तंबूल मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी यांसारख्या संघटनांशी संबंधित आहेत.

7) त्यांनी 1994 मध्ये तुर्कीमधील बिलकेंट विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन विभागातून पदवी प्राप्त केली.

8) बिल्केंट विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, अयसी यांनी 1995 मध्ये यूकेमधील लीड्स विद्यापीठात राज्यशास्त्र विभागामध्ये संशोधक म्हणून काम केले.

9) श्री आयजी (Ilker Ayci) यांनी 1997 मध्ये तुर्कीमधील मारमारा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी देखील पूर्ण केली.

10) इल्केर आयजी यांचा जन्म 1971 साली तुर्कीच्या इस्तंबूल शहरात झाला.