भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; दहा आमदारांचा प्रवेश 

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटच्या (एसडीएफ) 10 आमदारांनी आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षाच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात भाजपची ताकद वाढली आहे.

गंगटोक: सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ)चे दहा आमदार आज भाजपच्या गोटात सामील झाले. सर्व आमदारांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यादरम्यान भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी नव्या सदस्यांचे स्वागत केले. 

सिक्कीम विधानसभा निवडणुकीत पवनकुमार चामलिंगच्या पक्षाचे एसडीएफचे पंधरा आमदार निवडून आले होते. त्यापैकी आज दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नेतृत्वाखाली एसडीएफने राज्यात 25 वर्षे सरकार चालवले.

सध्या राज्यात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम)चे सरकार असून, प्रेम सिंह तमांग हे मुख्यमंत्री आहेत. 1993 मध्ये पवनकुमार चामलिंग यांनी एसडीएफची स्थापना केली होती. त्यानंतर झालेल्या सर्व पाच विधानसभा निवडणुकीत चामलिंग यांचे सरकार होते. 1994, 1999, 2004, 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एसडीएफचे पूर्ण बहुमताचे सरकार होते. मात्र, यावर्षी झालेल्या निवडणुकीत एसडीएफला पराभूत व्हावे लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 MLAs of Sikkim Democratic Front join BJP