गोव्यातील कॉंग्रेसचे आमदार भाजपवासी; दिल्लीत स्वागत 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली.

नवी दिल्ली ः गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या अर्धा तासाच्या भेटीनंतर डॉ. सावंत यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा प्रस्तावित विस्ताराबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊ असे पत्रकारांना सांगितले. 

भाजप सूत्रांच्या माहितीनुसार गोव्यात दहा फुटीर आमदारांचा गट सामील झाल्यावर भाजपचे संख्याबळ 27 पर्यंत वाढले आहे. कवळेकर यांच्यासह आतांसिओ मोन्सेरात, इजिदोर फर्नांडिस, अंतोनिओ फर्नांडिस, नीळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेरात, एलोवेरा फिलिप्स रॉड्रिग्स, क्‍लाफसियो डायस, विफ्रेंड डीसा हे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसमधील फुटीर आमदारांना काही मंत्रिपदे देणे क्रमप्राप्त आहे, त्याचप्रमाणे राज्यात उपमुख्यमंत्रिपद निर्माण केले जाईल अशीही माहिती भाजप सूत्रांकडून समजली. 

डॉ. सावंत यांनी आज दुपारी शहा यांच्याशी घडामोडींबद्दल सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर ते संसद भवनातून बाहेर पडले. दुपारी चारच्या सुमारास सर्व कॉंग्रेस आमदारांना घेऊन भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पोचले. तेथे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुलाबाचे फुल आणि भाजपचे उपरणे देऊन या सर्वांच्या भाजपावासी होण्यावर शिक्कामोर्तब केले. 

कॉंग्रेसने घर सांभाळावे! 
गोवा किंवा कर्नाटकमध्ये घडणाऱ्या घडामोडींमध्ये भाजपची काहीही भूमिका नसल्याचा पुनरुच्चार पक्षाने आज केला. पक्ष नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रेसने घर सांभाळावे असा सल्ला दिला. आपले विविध राज्यांतील आमदार अस्वस्थ आणि अतृप्त का आहेत, ते राजीनामा देण्याची घाई का करत आहेत, राजीनामा देण्याची सुरवात कोणी केली या प्रश्नांची उत्तरे कॉंग्रेसने स्वपक्षातच शोधावीत; त्यासाठी भाजपला दोष देऊ नये असे जावडेकर म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 rebel Goa Congress MLAs, CM Sawant meet JP Nadda in Delhi