अबब! दिल्लीत सापडले कोरोनाचे 15 रुग्ण

वृत्तसंस्था
Wednesday, 4 March 2020

भारतात दिल्ली, तेलंगणामध्ये कोरोनाची लक्षणे असलेली काही रुग्ण आढळली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रातही नाशिकमध्ये एक संशयित रुग्ण सापडला आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा वेगाने प्रसार होत असताना, भारतातही राजधानी दिल्लीमध्ये या रोगाचे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. इटलीहून आलेल्या 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

डीडी न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीहून आलेल्या 15 पर्यटकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. इटलीहून भारतात आल्यानंतर त्यांना आयटीबीपीच्या छावणीमध्ये ठेवण्यात आले होते. दिल्लीत आल्यानंतर एम्समध्ये नमुन्यांची तपासणी केली असता सर्व जणांना करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं निष्पन्न झाले. या सर्वांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

भारतात दिल्ली, तेलंगणामध्ये कोरोनाची लक्षणे असलेली काही रुग्ण आढळली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रातही नाशिकमध्ये एक संशयित रुग्ण सापडला आहे. भारताने सध्या चार देशांतील नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे करोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण मिळाल्यानंतर लोकांना न घाबरण्याचे तसेच एकत्र मिळून काम करण्याचे आवाहन केले आहे. आग्रा येथील या सहा रुग्णांची तपासणी निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 Italian tourists in India test positive for coronavirus