esakal | सलाम तिच्या कार्याला! बेवारस मृतदेहांना 16 वर्षांची मुलगी देतेय अग्नी

बोलून बातमी शोधा

corona dead body
सलाम तिच्या कार्याला! बेवारस मृतदेहांना 16 वर्षांची मुलगी देतेय अग्नी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. आतापर्यंत अनेकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. परंतु, या संकटकाळातही अनेकांमधील माणुसकीचं दर्शन घडलं. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बेवारस मृतदेहांवर काही सामाजिक संस्था, काही व्यक्ती स्वत: पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करत आहेत. यात एक १६ वर्षाची मुलगी आदर्श ठरली आहे. केवळ १६ वर्षांची असलेली ही मुलगी स्वत: पुढाकार घेऊन बेवारस असलेल्या कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे.

तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात राहणाऱ्या १६ वर्षीय देवीश्रीवर सध्या सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देवीश्री तिच्या दोन महिला सहकाऱ्यांसोबत बेवारस असलेल्या कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. देवीश्री अन्नम सेवा फाऊंडेशन या संस्थेशी निगडीत असून गेल्या कित्येक महिन्यांपासून ती कोरोनाग्रस्तांसाठी सातत्याने झटत आहे.

हेही वाचा: Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन

"या संस्थेविषयी मला पूर्वीपासूनच माहिती होती. त्यातच सप्टेंबर २०२० मध्ये रेल्वे रुळांवर एक बेवारस मृतदेह सापडला असून त्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर ही जबाबदारी घेण्यास मी तयार असल्याचं मी संस्थेला सांगितलं. विशेष म्हणजे त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेऊन मला पाठवलं व माझ्यासोबत दोन अन्य महिला सहकारीदेखील दिल्या. या घटनेनंतर माझ्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. माझ्याकडून जितकं शक्य आहे, ते सगळं करण्याचा प्रयत्न मी करते", असं देवीश्रीने सांगितलं.

दरम्यान, देवीश्री सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी असून ती इंटरमीडिएटचं शिक्षण घेत आहे. तर, तिचे आई-वडील येल्लांडु येथे एक नाश्त्याचा स्टॉल चालवतात.