पाकिस्तानच्या तुरुंगात ‘मिसिंग ५४’ वीर; १९७१ च्या युद्धातील भारतीय जवान झाले जिवंतपणीच हुतात्मा 

वृत्तसंस्था
Thursday, 17 December 2020

यंदा या घटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. या युद्धात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती, पण भारताच्या ५४ जवान व अधिकाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. 

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने केवळ विजय मिळविला नाही तर शेजारील देशाचे तुकडा पाडून बांगलादेशची निर्मिती झाली. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा या घटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. या युद्धात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती, पण भारताच्या ५४ जवान व अधिकाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. 

‘मिसिंग ५४’ असे म्हटल्या जाणाऱ्या या वीरांना बेपत्ता (मिसिंग इन ॲक्शन) किंवा मृत (किल्ड इन ॲक्शन) घोषित करण्यात आले असले तरी हे जवान आजही जिवंत असून पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरुंगात कैद असल्याचे मानले जात आहे. या बेपत्ता ५४ जणांमध्ये ३० लष्कराचे आणि २४ जण हवाई दलाचे जवान आहेत. पश्‍चिमी आघाडीवर लढत असताना त्यांना पकडण्यात आले होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानच्या सैनिकांना सोडले, पण... 
१९७१ मधील युद्धानंतर झालेल्या सिमला करारानुसार शरण आलेल्या ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना परत पाठवण्यात आले, मात्र भारताच्या ५४ जवानांबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यावरुन१९७९ मध्ये संसदेत अमरसिंह पठावा यांनी प्रश्‍न उपस्थित केला असता उत्तरादाखल तत्कालीन परराष्ट्र मंत्री समरेंद्र कुंडू यांनी ४० बेपत्ता जवानांची यादी लोकसभेत सादर केली. या जवानांना ज्या तुरुंगात ठेवलेले आहे, त्यांची नावेही त्यात नमूद केली होती. नंतर या यादीत आणखी १४ जणांची नावे जोडण्यात आली. 

‘मी पाकिस्तानच्या तुरुंगात’ 
भारत-पाकिस्तानमधील ही लढाई एका हाताने लढणारे मेजर कंवलजितसिंह हे एकमेव अधिकारी होते. मेजर नसले असते तर पंजाबमधील फिरोजपूर आज पाकिस्तानात दिसले असते, असे म्हटले जाते. त्यांची पत्नी जसबीर कौर आणि एकुलती मुलगी आजही कंवलजितसिंह यांची वाट पाहत आहेत. युद्धाच्या १२ वर्षांनंतर त्यांनी गुरुमुखीत लिहिलेले पत्र मिळाले होते. त्यात कंवलजितसिंह यांनी पाकिस्तानच्या लखपत तुरुंगात कैद असल्याचे सांगत त्यांच्या छळवणुकीची कहाणीही कथन केली होती. ‘मेजर कंवलजितसिंह होते असे म्हणू नका, ते जिवंत आहेत,’ असे आर्जव त्यांची पत्नी सातत्याने करीत असते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पत्र, पुस्तकांतून जिवंतपणाचे पुरावे 
काही माध्यमांच्या वृत्तानुसार बेपत्ता असलेले मेजर अशोक सुरी यांचे १९७४ मध्ये पत्र आले होते. कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी जिवंत असल्याचे सांगितले होते. लष्कराने त्यांना ‘मृत’ घोषित केलेले होते. १९७५ मध्ये कराचीहून आलेल्या  पोस्टकार्डात २० भारतीय जवान जिवंत असल्याचे नमूद केले होते. १९८०मध्ये व्हिक्टोरिया शॉफिल्ड यांनी लिहिलेल्या ‘भुट्टो- ट्रायल अँड एक्झिक्युशन’ या पुस्तकात अशा एका कारागृहाचे चित्रण आहे की, ज्यात भारतीय जवान बंदिस्त आहेत. 

रेडिओवरून झाली घोषणा 
युद्धात विंग कमांडर एच. एस. गिल यांचे विमान पाकिस्तानमध्ये जाऊन पडले होते. गिल हे ‘हाय स्पीड’ या नावाने ओळखले जात असत. त्यांना जिवंत पकडल्याचे वृत्त रेडिओवरून प्रसारित करण्यात आले होते. मुख्तियारसिंह नावाच्या एका स्मगरलची सुटका १८ वर्षांनंतर झाली तेव्हा त्याने कॅप्टन रवींद्र कौरा हेही त्याच्याच तुरुंगात असल्याचे उघड केले होते. सरकारने बेपत्ता जवानांच्या ठावठिकाणाची माहिती स्पष्ट करून त्यांच्या कुटुंबीयांनी दिली पाहिजे, अशी मागणी युद्धाच्या पहिल्याच दिवशी बेपत्ता झालेले मेजर एस.पी.एस.वराइच यांची मुलगी व ‘मिसिंग डिफेंस पर्सन्स रिलेटिव्ह असोसिएशन’ (एमडीपीआरए) च्या सदस्या सिम्मी वराईच यांनी केली आहे. 

सरकार ते ‘यूएन’पर्यंत धाव 
या युद्धातील बेपत्ता जवानांच्या कुटुंबांतील सदस्यांनी १९८३ ते २००७ या काळात पाकिस्तानच्या तुरुंगांनाही भेट दिली, पण हाती काहीच गवसले नाही. या कुटुंबीयांनी सरकारपासून संयुक्त राष्ट्रांचा (यूएन) दरवाजाही ठोठावला आहे. सर्वोच्च न्यायालयात २०१५ मध्ये झालेल्या सुनावणीत ‘या सर्व जवानांचा मृत्यू झाला असावा, असे आम्हाला वाटत असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. त्यांना बंदिस्त केल्‍याच्या गोष्टीचा पाकिस्तान इन्कार करीत असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

पाकिस्तानचा खोटेपणा 
युद्धाच्या मैदानात भारतासमोर पाकिस्तानचा कधीही टिकाव न लागलेला पाकिस्तान त्यांच्या ताब्यात भारतीय जवान असल्याची बाब १९८९पर्यंत फेटाळत होता. जेव्हा बेनझीर भुट्टो या सत्तेवर आल्या तेव्हा त्यांनी प्रथमच ही गोष्ट मान्य केली. पण त्यानंतरही पाकिस्तानने याकडे दुर्लक्षच केले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या १९८४ मध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानने बेपत्ता जवानांप्रमाणे नावे असलेले कैदेत असल्याचे मान्य केले होते, असा दावा पत्रकार चंदर एस. डोगरा यांनी त्यांच्या ‘मिसिंग इन ॲक्शन ः द प्रीझनर्स हू डीड नॉट कम बॅक’ या पुस्तकात केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1971 India-Pakistan War 54 Indian soldiers and officers in Pakistani jail