नितीशकुमार यांचा संयम ढासळला; विषारी दारू प्यायल्याने २३ जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

23 people died after drinking poisonous liquor Nitishkumar BJP MLAs accused of selling liquor

नितीशकुमार यांचा संयम ढासळला; विषारी दारू प्यायल्याने २३ जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमधील सारणमध्ये विषारी दारू प्यायल्याने २३ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी एकच गोंधळ झाला. भारतीय जनता पक्षाने या मृत्यूंना मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दोषी ठरविले. यावर संतप्त झालेल्या नितीशकुमार यांचा संयम ढासळला आणि भाजपचे आमदार दारू विकत असल्याचा गंभीर आरोप केला. सारण जिल्ह्यातील इसुआपूर गावावर गेले दोन दिवस दुःखाची छाया होती. येथील ग्रामस्थ आजारी पडून मरण पावण्याच्या घटना सलग घडल्या. काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत २३ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला, असा दावा करण्यात येत आहे.

मात्र यातील मृतांची अधिकृत संख्या आठ असल्याचे सांगण्यात येत आहे. दहा जण आजारी पडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेवरून विधानसभेत भाजपच्या आमदारांनी सरकारला घेरले. मुख्यमंत्री याला दोषी असल्याचा दावा करीत सभागृहात आणि सभागृहाबाहेर त्यांच्या सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विधान परिषदेतही भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. पक्षाचे सम्राट चौधरी यांनी सारणमधील या मृत्यूंना नितीश कुमार जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याची मागणी

भाजपचे आरोप ऐकून नितीशकुमार यांचा संयम ढासळला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, की तुम्ही लोक दारू विकत आहात. माझे सरकार तुम्हाला सोडणार नाही. एक-एक करून आम्ही तुमचा बुरखा फाडू. भाजपच्या सदस्यांकडे रागाने पाहून ‘काय झाले आहे? ए, गप्प बसा’,’ असे ते म्हणाले. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा कार्यवाही सुरू झाली तेव्हाही भाजपचे आमदार नितीशकुमार यांच्या माफीवर अडून बसले होते.

दारूबंदी कायम

बिहारमधील दारुबंदी फोल ठरली असल्याचा दावा विरोधी पक्ष करीत असताना नितीश कुमार यांनी ‘बिहारमध्ये दारुबंदी आहे आणि ती पुढेही लागू असेल, असे ठामपणे सांगितले. समाजातील मोठा वर्ग दारूबंदीचे समर्थन करीत आहे, पण काही जण उगाचच विरोध करीत असल्याचे ते म्हणाले.