कर्नाटकमध्ये फक्त दोन महिन्यात 9 वर्षांखालील 40 हजार बालकांना कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children

कर्नाटकमध्ये फक्त दोन महिन्यात 9 वर्षांखालील 40 हजार बालकांना कोरोनाची लागण

बंगळुरू : कर्नाटकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (corona second wave in karnataka) किशोरवयीन आणि लहान मुलांना (children found corona positive) मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये 0-9 या वयोगटातील मुलांना झालेला संसर्ग हा 18 मार्चपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या तब्बल 143 टक्के, 10-19 वयोगटात 160 टक्के वाढल्याचे दिसून आले. राज्याच्या वॉर रुमनुसार, 0-9 या वयोगटातील 39, 846 मुलं, तर 10-19 वयोगटातील 1,05,044 मुलांना 18 मार्च ते 18 मे या काळावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून या 18 मार्चपर्यंत या वयोगटातील रुग्णांची संख्या २७, ८४१ आणि ६५, ५५१ होती. (40 thousand children below 9 years found corona positive in last two months in karnataka)

हेही वाचा: "आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे गं"; वाढली पालकांची डोकेदुखी

येत्या १८ मार्चपर्यंत २८ मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर १८ मेपर्यंत १५ मुलांची आणखी त्यात भर पडली. गेल्या दोन महिन्यात किशोरवयीन मुलांमधील मृत्यू हे ४२ वरून ६२ वर पोहोचले. लहान मुलांमधील मृत्यूचा सरासरी दर हा दुसऱ्या लाटेमध्ये तीनपटीने वाढला, तर किशोरवयीन मुलांमध्ये दुप्पट झाला आहे.

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यानंतर दोनच दिवसांत संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच काही प्रकरणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पालकांमुळेच लहान मुलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर सर्वाधिक प्रकरणांमध्ये लहान मुलेच हे त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वात आधी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण लवकर होत असून त्यांच्यामुळे घरातील प्रौढ व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. एकदा लहान मुलांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या पालकांनी देखील त्यांच्यासोबत स्वतःला विलगीकरणात ठेवणे गरजेचे असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येकी १० मुलांपैकी केवळ एकाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत असते, तर इतर घरातच उपचार घेऊन ठीक झाले असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. तसेच मुलांना ताप, खोकला, हगवण आणि उलट्यांचा त्रास होत असेल तर कोरोना टेस्ट लगेच करून घ्यावी. तसेच लहान मुलांचे सीटी स्कॅन, डी जायमर टेस्ट किंवा ब्लड टेस्ट न करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला.

अनेक पालकांना कोरोनाची लागण झाल्यास मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडे ठेवतात. मात्र, लहान मुलांमुळे कोरोना वेगाने पसरतो. त्यामुळे त्यांच्यापासून वृद्धांना धोका असतो. त्यामुळे याबाबत पालकांनी खबरदारी घ्यायला हवी, असेही डॉक्टर म्हणाले.

loading image
go to top