आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी 'ही' खुशखबर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जुलै 2019

गेल्या काही वर्षात आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.

हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये आंतरजातीय विवाहासाठी 41 कोटी रुपायांची तरतूद केली आहे. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी काल (ता.12) विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला.   

एकीकडे देशभरात अनेक ठिकाणी विविध जातींच्या आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत. तसेच गेल्या काही वर्षात आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने आंतरजातीय विवाह करण्यासाठी तरुण-तरुणींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी 41 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.  

गेल्या वर्षी आंतरजातीय विवाहासाठी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने 'चंद्रान्ना पेल्ली कनुका' ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलाने अनुसूचित जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यास तसेच इतर मागासवर्गीय मुलाने इतर मागासवर्गीय मुलीसोबत लग्न केल्यास त्यांना सरकारतर्फे अनुक्रमे 40 हजार आणि 30 हजार रुपये दिले जात होते.

जगन मोहन यांच्या सरकारने आंतरजातीय विवाहासाठी 41 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 crores for inter caste marriage