अबब... भारतीयांचा तब्बल एवढा काळा पैसा परदेशात

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

परदेशातील बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन भाजपने 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. आता परदेशी बँकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाशी संबंधित काही आकडे समोर आले आहेत. ही आकडेवारी डोळे विस्फारुन टाकणारी आहे. मोदी सरकार याबाबत काय पाऊले उचणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नवी दिल्ली : परदेशातील बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या काळ्या पैशाचा आकडा तुम्ही पाहिला तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे, की भारतीयांचा परदेशातील बँकांमध्ये तब्बल 490 अब्ज डॉलर एवढा काळा पैसा जमा आहे.

परदेशातील बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन भाजपने 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. आता परदेशी बँकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाशी संबंधित काही आकडे समोर आले आहेत. ही आकडेवारी डोळे विस्फारुन टाकणारी आहे. मोदी सरकार याबाबत काय पाऊले उचणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन संस्थांनी काळ्या पैशाशी संबंधित आकडेवारी प्रसिद्ध केली. या तीन संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला एक अहवाल सोमवारी संसदेत मांडण्यात आला. 1980 ते 2010 या कालावधीत देशातून जवळपास 246.48 अब्ज डॉलर (17,25,300 कोटी रुपये) ते 490 अब्ज डॉलर (34,30,000 कोटी रुपये) इतका काळा पैसा परदेशात गेल्याची आकडेवारी या संस्थांनी समोर आणली आहे. रियल इस्टेट, खाणकाम, फार्मासिटीकल, पान मसाला, गुटखा, तंबाखू, चित्रपट, शिक्षण या क्षेत्रांमधून काळ्या पैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं. अर्थ विषयाशी संबंधित स्थायी समितीने 'स्टेटस ऑफ अनअकाऊंटेड इन्कम/वेल्थ बोथ इनसाइड अँड आऊटसाइड द कंट्री-ए क्रिटिकल अ‍ॅनालिसिस' हा अहवाल सादर केला.

नॅशनल काऊंसिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चनं (एनसीएईआर) 1980 ते 2010 या कालावधीत भारतातून 26,88,000 लाख कोटी रुपये ते 34,30,000 कोटी रुपयांचा काळा पैसा परदेशात गेल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंटने (एनआयएफएम) 1990 ते 2008 या कालावधीत जवळपास 9,41,837 कोटी रुपये (216.48 अब्ज डॉलर) इतका पैसा देशाबाहेर गेल्याचा अंदाज वर्तवला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड फायनान्स या संस्थेनं 1997 ते 2009 या काळात देशाच्या एकूण जीडीपीच्या 0.2 ते 7.4 टक्के इतका पैसा परदेशात गेल्याचं म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 490 billion rupees in black money stashed abroad by Indians