Mukesh Ambani : ‘यूपी’त ७५ हजार कोटींची गुंतवणूक; मुकेश अंबानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

75 thousand crores investment in UP Mukesh Ambani announcement at UP Global Investors Summit

Mukesh Ambani : ‘यूपी’त ७५ हजार कोटींची गुंतवणूक; मुकेश अंबानी

लखनौ : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुढील चार वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीतून सुमारे एक लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

लखनौ येथे आयोजित “यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समीट”मध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. मुकेश अंबानी यांनी २०२३ च्या अखेरीस उत्तर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये जिओची फाइव्ह-जी सेवा उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षात एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ‘यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समीट’मध्ये आज व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘‘रिलायन्स उत्तर प्रदेशमध्ये १० गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. उत्तर प्रदेशातील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प असेल.’’

यावेळी अंबानी यांनी बायो-गॅस ऊर्जा व्यवसायात उतरण्याचीही घोषणा केली. यामुळे शेतकरी केवळ अन्नदाताच नाही, तर ऊर्जा पुरवठादारही होतील, असेही मुकेश अंबानी म्हणाले.

त्यांनी यावेळी राज्यातील गावे आणि लहान शहरांमध्ये परवडणारे शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठी जिओ प्लॅटफॉर्मद्वारे जिओ-स्कूल आणि जिओ-एआय-डॉक्टर या दोन प्रकल्पांचीही घोषणा केली. उत्तर प्रदेशातील कृषी आणि बिगर कृषी उत्पादनांचे स्रोत वाढवण्याचा मानस व्यक्त करत, याचा फायदा शेतकरी, स्थानिक कारागीर, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल, असेही त्यांनी नमूद केले.

मुकेश अंबानींच्या घोषणा

  • उत्तर प्रदेशात चार वर्षांत ७५ हजार कोटींची गुंतवणूक

  • २०१८ पासून ५० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे

  • नव्या गुंतवणुकीसह एकूण गुंतवणूक १.२५ लाख कोटी

  • एक लाख नवे रोजगार निर्माण होतील

  • सर्व शहरांमध्ये २०२३ च्या अखेरीस फाइव्ह-जी सेवा

  • उत्तर प्रदेश पाच वर्षांत एक लाख कोटींची अर्थव्यवस्था

आजघडीला देशात सोशल, फिजिकल आणि ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर’वर झालेल्या कामाचा मोठा लालभ उत्तर प्रदेशला मिळाला आहे. या राज्यातील लोक सामाजिक आणि आर्थिक आघाडीवर अधिक जोडले गेले आहेत. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात दहा हजार बायो इनपूट रिसोर्स तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंना त्याचा लाभ मिळेल आणि उद्योगासाठी देखील गुंतवणुकीची शक्यता वाढेल.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

उत्तर प्रदेशने गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा मूलमंत्र घेऊन वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्याने भरीव कामगिरी केली आहे.

- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश हे नव्या भारताचे आशाकेंद्र आहे. नोएडा ते गोरखपूरपर्यंत लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आम्ही एकत्रितपणे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या राज्याचे देशातील सर्वांत समृद्ध राज्यांमध्ये रूपांतर करू.

- मुकेश अंबानी

टॅग्स :mukesh ambaniUPInvestment