अरुणाचलमध्ये चीनने गावच नाही, तर मिलिट्री कॅम्पही वसवलेत; भाजप खासदाराची कबुली

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 19 January 2021

अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने गावं वसवल्याने चिंता वाढली आहे

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने गावं वसवल्याने चिंता वाढली आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे असताना अरुणाचल मधील बातमीमुळे उभय देशांमधील तणाव अधिक वाढणार आहे. भाजपचे खासदार तापिर गाओ यांनी मंगळवारी या मुद्द्यावरुन भाष्य केलं आहे. चीन फार पूर्वीपासून येथे गावाचे निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. 

वृत्त संस्था एएनआयशी बोलताना तापिर गाओ म्हणाले की, 80 च्या दशकात चीनने या भागात घुसखोरी केली होती आणि याठिकाणी त्यांनी गावं वसवली आहे. चीनने यापूर्वीच मॅकमोहन रेषेच्या आत येऊन भारतीय सीमेच्या आत बीसा आणि माजामध्ये मिलिट्री बेस बनवले आहेत. 80 च्या दशकापासूनच चीनचे याठिकाणी अस्तित्व आहे.

अर्णब चॅट प्रकरणावरून राहुल गांधी पहिल्यांदा बोलले

चीनने लौंगजू ते माजापर्यंत रोड बनवला आहे. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात चीनने तवांगमध्ये सुमदोरोंग चू वॅलीमध्ये घुसखोरी केली होती. तत्कालीन आर्मी प्रमुखांनी याविरोधात एक योजना बनवली होती, पण राजीव गांधी यांनी चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यास नकार दिला होता. काँग्रेस सरकारचे चुकीचे धोरण होते. त्यांनी सीमेवर रस्ते बनवले नाहीत, त्यामुळे 3-4 किलोमीटरचा बफर झोन राहिला नाही आणि चीनने या भागावर ताबा मिळवला. नवीन गावांची निर्मिती काही नवीन गोष्ट नाही, काँग्रेसच्या काळापासूनच असं होतं आहे, असं तापिर गाओ म्हणाले आहेत. 

दरम्यान, चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये गावं वसवली आहे. ही गाव भारतीय सीमेच्या आत आहेत. 1 नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोंमधून हे स्पष्ट झाले आहे. भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ही गावे 4.5  किलोमीटर आतमध्ये आहेत. विशेष म्हणजे, 26 ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेल्या सॅटेलाईट फोटोंमध्ये ही गावे नव्हती. त्यामुळे एक वर्षांपूर्वीच गावं वसवण्याच आल्याचे स्पष्ट होतंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Since the 80s till today China are occupying this area Tapir Gao BJP MP from Arunachal Pradesh