अर्णब चॅट प्रकरणावरून राहुल गांधी पहिल्यांदा बोलले

टीम ई सकाळ
Tuesday, 19 January 2021

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्र सोडले.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्र सोडले. कृषी कायदे शेतीला उद्ध्वस्त करतील. मी या गोष्टीचा विरोध करत राहीन. जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही फक्त शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन असं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. यावेळी अर्णब गोस्वामी यांच्या चॅट लीक प्रकरणावरूनही राहुल गांधींना प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, हे क्रिमिनल अ‌ॅक्ट आहे. 

देशाच्या सुरक्षेविषयीची अधिकृत आणि गुप्त अशी माहिती इतर व्यक्तींना कशी माहिती होऊ शकते? पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि एअर फोर्स प्रमुख यांच्याशिवाय ती इतरांना देणं हा गुन्हा आहे. गुप्त माहिती अशी लीक झाल्यानंच भारताचं एअरक्राफ्ट त्यावेळी पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

अर्णब गोस्वामीला माहिती मिळू शकते तर पाकिस्तानला सहज पोहचली असेल असंही राहुल गांधींनी म्हटलं. भारताच्या लष्करी कारवायांबद्दल अशा प्रकारे माहिती बाहेर पोहोचवली जात असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. अर्णब गोस्वामींना माहिती कोणी दिली हे समजायला हवं? मोदींनी सांगितलं की, संरक्षण मंत्र्यांनी की गृहमंत्र्यांनी त्यांना सांगितलं हे आम्हाला समजायलाच हवं असं राहुल गांधींनी म्हटलं. 

हे वाचा - VIDEO LIVE : मला गोळ्या घालू शकतात, पण हात लावायची हिंमत नाही; राहुल गांधी आक्रमक

रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यामध्ये अनेक मंत्र्यांबद्दलचा उल्लेख आहे. तसंच बालाकोट एअर स्ट्राईक आधीपासूनच अर्णब गोस्वामी यांना माहिती होता, असंही चॅट यामध्ये आहे. फक्त भारतातच नाही तर याबाबतची चर्चा पाकिस्तानात देखील होत आहे. पाकिस्तान सरकारमधील केंद्रीय मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी अर्णब गोस्वामी यांच्या या व्हॉट्सऍप चॅटचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi talks on arnab goswami whatsapp chat leak