पाकिस्तानी खजुरामुळे बुडाले नऊ कोटी रुपये

अनिश पाटील
Saturday, 21 September 2019

पाकिस्तानची ‘खजूरगिरी’ रोखण्यासाठी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) देशातील सर्व बंदरे व विमातळांवर ‘मोडस ऑपरेंडी सर्क्‍युलर’ जारी करून खबरदारी घेण्यास सांगितले.  पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवरील सीमाशुल्क २०० टक्के करण्यात आले. त्यामुळे आता पाकिस्तानी वस्तू ओमानमार्गे भारतात आणून सीमाशुल्क बुडवण्यात येत असल्याचे समोर आले.

सीमाशुल्क वाढीमुळे पाकिस्तानऐवजी ओमानमार्गे होणाऱ्या वाहतुकीचा फटका
मुंबई - पाकिस्तानची ‘खजूरगिरी’ रोखण्यासाठी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) देशातील सर्व बंदरे व विमातळांवर ‘मोडस ऑपरेंडी सर्क्‍युलर’ जारी करून खबरदारी घेण्यास सांगितले.  पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवरील सीमाशुल्क २०० टक्के करण्यात आले. त्यामुळे आता पाकिस्तानी वस्तू ओमानमार्गे भारतात आणून सीमाशुल्क बुडवण्यात येत असल्याचे समोर आले. ‘डीआरआय’ने अटक केलेल्या एका टोळक्‍याच्या चौकशीत अशा पद्धतीने ४० वेळा भारतात खजूर आणल्याने नऊ कोटींचे सीमाशुल्क बुडाल्याचे उघड झाले. 

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर १६ फेब्रुवारीला पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवरील सीमाशुल्क २०० टक्के करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानी उत्पादने भारतात आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना फटका बसला. म्हणून ओमानमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या माध्यमातून या वस्तू तेथे जातात आणि नंतर भारतात पाठवण्यात येतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून ओमानमार्गे ६० कंटेनर खजूर मुंबईत आणण्यात आला. याबाबत ‘डीआरआय’ला विशेष माहिती मिळाली होती. 
त्यानुसार या सर्व व्यापाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. केबीएन ट्रेडलिंक व ईश्‍वर ट्रेडर्स यांच्यामार्फत खजुराचे कंटेनर भारतात आणले जात होते. याबाबत कसून चौकशी केली असता, पाकिस्तानी खजूर ओमानमार्गे आणत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यावरून इम्रान इब्राहिम तेली, इरफान नूरसुमार, मोहनदास कटारिया, सेवक मखजिया या व्यापाऱ्यांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने अटक केली. त्यांनी ४० वेळा पाकिस्तानातील खजूर ओमानमार्गे भारतात आणून नऊ कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 Crore Rupees Loss by Pakistan Khajur