
सगळं सहन करेन मात्र, बेईमानी आणि गैरवर्तन नाही; केजरीवालांनी आमदारांना दिली तंबी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाबच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संबोधित केलंय. त्यांनी म्हटलंय की, आज मी अत्यंत आनंदी आहे तसेच भावनिकही झालो आहे. पहिली गोष्ट म्हणजे पंजाबच्या लोकांनी ज्याप्रकारे मतदान केलंय आणि दुसरं म्हणजे मान साहेबांनी गेल्या तीन दिवसांमध्ये जी कमाल केली आहे, त्याची संपूर्ण देशात चर्चा होत आहे.
मान साहेबांनी संपूर्ण पंजाबला निमंत्रण दिलं त्यामुळे पंजाबी लोकांना वाटालं की ते स्वत:चं शपथ घेत आहेत. मान साहेबांनी दुसऱ्या लोकांच्या सिक्योरिटीला सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कामाला लावलं. लोकांच्या पीकाला भाव मिळू लागला.
केजरीवाल यांनी पुढे म्हटलं की, २५ हजार नोकऱ्या देण्याचं आश्वासन हे खूप मोठं आश्वासन आहे. लोकांना आमच्याकडून आशा होती. तीन दिवसांमध्ये तुम्ही जे करुन दाखवलंय, ते पाहता लोकांची आशा आता विश्वासामध्ये परिवर्तित होत आहे. खूप खूप सदिच्छा! एका बाजूला आपने शपथ घेऊन काम सुरु केलंय तर दुसरीकडे भाजपवाले चार राज्यांमध्ये सरकारही बनवू शकत नाहीयेत. त्यांची भांडणं सुरु आहेत.
आपल्या जवळ कमी वेळ आहे. मान साहेब तुम्हा सगळ्यांना टार्गेट देतील. जर ते टार्गेट पूर्ण झालं नाही तर लोक म्हणतील की मंत्री बदलावा लागेल. मी ऐकलं की काही लोक जे मंत्री बनू शकले ननाहीत ते नाराज आहेत. आपले ९२ आमदार आहेत. १७ मंत्री बनू शकले. तुम्ही स्वत:ला मंत्र्यांहून कमी समजू नका. वेगवेगळ्या इच्छा नका बाळगू, एक टीम म्हणून काम करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सर्वांना जबाबदारी मिळेल. भगवंत मान जी जबाबदारी देतील, ती पूर्ण करा. तुमच्यापैकी ९९ टक्के लोक पहिल्यांदा आमदार बनलेत. तुम्ही अनेक मोठ्या लोकांना हरवलं आहे. मात्र गर्व करु नका. तुम्ही असा विचार नका करु की या पदावर माझा हक्क होता. ही गोष्ट जनताच ठरवते. आपल्याला जनतेचं हृदय जिंकायचं आहे.
पुढे ते म्हणाले की, मी सगळं काही सहन करु शकतो मात्र, बेईमानी नाही. काम करण्याची संधी देऊ मात्र, जर बेईमानी केली तर तुमच्यावर कारवाई होईल. काहीही करा मात्र, जनतेसोबत बेईमानी करु नका तसेच जनतेसोबत चुकीचं वर्तन करु नका.