ममता यांच्या सरकारविरुद्ध आम आदमी पक्षाची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aam Aadmi Party protests against Mamatas government

ममता यांच्या सरकारविरुद्ध आम आदमी पक्षाची निदर्शने

कोलकाता - पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारविरुद्ध आम आदमी पक्षाने (आप) रविवारी आंदोलन केले. रामलीला मैदानावर सुमारे दोन हजार कार्यकर्ते जमले. तेथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मायो मार्गावरील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हे भ्रष्ट सरकार नको अशा आशयाचे बंगाली भाषेतील फलक आंदोलकांनी झळकाविले.

आपच्या एका नेत्याने सांगितले की, सरकारमधील एक मंत्री तसेच त्यांच्या महिला सहकाऱ्याच्या घरात कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली आहे. त्यामुळे या सरकारला एकही दिवस सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. ममता बॅनर्जी यांच्या आपचे पश्चिम बंगालमधील अस्तित्व नगण्य आहे, मात्र गेल्या वर्षभरापासून या पक्षातर्फे ममता यांच्या विरोधात संधी मिळेल तेव्हा निदर्शने केली जातात. या आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांची संख्या पाहता हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याप्रकरणी उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे.

चॅटर्जींबद्दलच्या वक्तव्यामुळे तृणमूलची प्रवक्त्यांना ताकीद

कोलकाता ः शिक्षक कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी पक्षाने निलंबित केलेले नेते पार्थ चॅटर्जी यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल तृणमूल काँग्रेसने रविवारी प्रवक्ते कुणाल घोष यांना ताकीद दिली. आता किमान १४ दिवस प्रसार माध्यमांशी बोलताना चॅटर्जी यांच्याबद्दल कोणतेही भाष्य करू नये असे त्यांना बजावण्यात आले. अलीकडेच कुणाल म्हणाले होते की, तुरुंगात असताना कसे वाटते हे पार्थ यांना आता कळले असेल. मी बराच काळ तुरुंगात घालविला आहे. आता पार्थ यांना हेच करू दिले जावे.

हा गैरव्यवहार उघडकीस आल्यापासून चॅटर्जी यांच्याविरुद्ध कुणाल यांनी जाहीर टीका केली आहे. चॅटर्जी यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्याबाबत वक्तव्य करताना पक्षाच्या सूचनांचे उल्लंघन करू नये असे सर्वच नेत्यांना तृणमूल काँग्रेसने बजावले आहे.

Web Title: Aam Aadmi Party Protests Against Mamatas Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..