
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejarival) यांनी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली - आम आदमी पक्ष आता उत्तराखंडच्या राजकारणात उतरणार आहे. आज पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejariwal) यांनी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले की, पक्षाने नुकतंच डोंगराळ राज्य असलेल्या उत्तराखंडमध्ये सर्वेक्षण केले आहे. येथील बहुतांश भागातील लोकांची 'आप'ने उत्तराखंडमध्ये निवडणुका लढवाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे.
केजरीवाल यांनी स्पष्टपणे जाहीर केले की आप आता आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "उत्तराखंडमध्ये निवडणुका लढविण्याबाबत आम्ही सुरुवातीला साशंक होतो, यासाठीच आम्ही तिथे सर्वेक्षण केले. त्यात 62 टक्के लोकांनी आम्ही उत्तराखंडमध्ये निवडणुका लढवण्याच्या बाजूने कल दिला." सध्या आप पक्षविस्तारासाठी उत्तराखंडमध्ये निवडणुका लढविणार असल्याचे दिसत आहे.
हे वाचा - उत्तर भारतात तुफान पाऊस; दिल्ली मुंबईसारखी तुंबली, ट्रॅफिकचे तीन-तेरा
कॉंग्रेसबरोबर (Congress) युती करून सुमारे एक वर्ष सरकार बनवल्यानंतर आपने दिल्लीत सलग दोनदा मोठ्या फरकाने विजय मिळवून दिल्लीतील भाजपा आणि कॉंग्रेसचे खूप वाईट हाल केले होते. 'सध्या उत्तराखंडमध्ये बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्याबरोबरच पायाभूत सुविधाही मुख्य समस्या आहेत, हेच मुद्दे घेऊन आप आता उत्तराखंडच्या राजकारणात वापरु शकते. तसेच आप उत्तराखंडमधील सर्व 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उत्तराखंडनंतर आम आदमी पार्टी पंजाब आणि गोव्यातही निवडणुका लढवणार असल्याचे सांगितलं जातंय.
उत्तराखंड की जनता इस बार आम आदमी पार्टी के साथ मिलकर अपने अधिकारों और नई उम्मीदों का चुनाव लड़ेगी। pic.twitter.com/esMbEJBiX8
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 20, 2020
दिल्लीचे उदाहरण देत केजरीवाल म्हणाले की, आपची दिल्लीत व्यवस्थित स्थापना झालेली नव्हती परंतु त्या स्थितीतही स्थापनेच्या दोन वर्षातच आम्ही कॉंग्रेस आणि भाजपला दिल्लीत मोठ्या फरकाने पराजित केले होते. देशाच्या इतर भागांप्रमाणेच उत्तराखंडमधील कॉंग्रेस आता संपली आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकसारख्या राज्यातील स्थिती पाहता लोक कॉंग्रेसला मतदान देणे शक्य नाही.