न्यायव्यवस्था केवळ राज्यघटनेला उत्तरदायी - एन.व्ही. रमण

सरन्यायाधीश रमण : सत्ताधारी, विरोधकांचे कान टोचले
NV Ramana
NV RamanaSakal

नवी दिल्ली : सध्या भारतामध्ये सत्तेत असलेल्या पक्षाला स्वतःच्या प्रत्येक कृत्याचे न्यायव्यवस्थेने समर्थन करावे असे वाटते तर विरोधकांना स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी न्यायव्यवस्थेने त्यांच्यासाठी पूरक भूमिका घ्यावी त्यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा असते, पण न्यायव्यवस्था ही केवळ आणि केवळ राज्यघटनेला उत्तरदायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी आज केले. आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असताना राज्यघटनेनी प्रत्येक संस्थेची निश्चित केलेली भूमिका आणि त्यांच्या जबाबदाऱ्या लोकांना समजून घेता आलेल्या नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे ‘असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन’ या संघटनेकडून आयोजित गौरवसमारंभात ते बोलत होते. मुळातच चुकीच्या पद्धतीने विचार केला जात असल्याने लोकांना राज्यघटना आणि लोकशाही संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत पुरेसे आकलन झाल्याचे दिसत नाही.

सध्या लोकांमधील अज्ञानालाच प्रोत्साहन दिले जात असल्याचे दिसून येते. यामुळे अशा स्वायत्त संस्थांचे काम ठप्प व्हावे किंवा त्यांची गती मंद व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या शक्तींना मदत होत असल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आम्ही फक्त केवळ आणि केवळ राज्यघटनेला उत्तरदायी आहोत, असे न्या. रमण यांनी स्पष्ट केले. भारतातील जनतेने त्यांचे काम चोखपणे केले आहे. लोकांच्या सामूहिक शहाणपणावर शंका घेण्याचे काही कारण नाही. स्वतःची जबाबदारी ओळखण्यात आमच्याकडे शहरातील सुशिक्षितांपेक्षा ग्रामीण भागातील मतदार अधिक जागरूक असल्याचे दिसून येते. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश वैविध्यासाठी ओळखले जातात. याच वैविध्याचा आपण सन्मान केला पाहिजे तसेच त्याला प्रोत्साहनही दिले पाहिजे. जगात सगळीकडेच हे होणे गरजेचे आहे, असे न्या. रमण यांनी स्पष्ट केले.

घटनात्मक संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे

राज्यघटनेने जी संतुलन आणि समन्वयाची संकल्पना मांडली आहे त्यानुसार आपल्याला भारतामध्ये घटनात्मक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपल्याला व्यक्ती आणि संस्थांची भूमिका आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. शेवटी लोकशाहीमध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो, असेही रमणा यांनी स्पष्ट केले. अब्राहम लिंकन यांच्या वक्तव्याचा दाखला देत रमण यांनी भारतामध्ये दर पाच वर्षांनी जनताच सत्ताधाऱ्यांचा निवाडा करते असे स्पष्ट केले.

वैविध्याचा आदर होणे गरजेचे

न्या. रमण म्हणाले, ‘‘ अमेरिकी समाज याच वैविध्याचा आदर करत असल्याने आज हा देश प्रगतिपथावर पोचला आहे. अमेरिकी समाजाची सहिष्णुता व सर्वसमावेशक दृष्टिकोन यांच्यामुळे जगातील सर्वोत्तम टॅलेंट तुमच्याकडे आकर्षित झाले आहे, याचा फायदा अमेरिकेला होत आहे. सगळ्या समाजघटकांचा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवायचा असेल तर वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या प्रज्ञावंतांचा सन्मान करणे गरजेचे आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com