Aditya Thackeray : तेजस्वी ‘लंबी रेस का घोडा’: आदित्य ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejasvi Yadav-Aditya Thackeray:

Aditya Thackeray : तेजस्वी ‘लंबी रेस का घोडा’: आदित्य ठाकरे

पाटणा : बिहार दौऱ्यावर आलेल्या ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे राजकारणातील ‘लंबी रेस का घोडा’ अशा शब्दांत कौतुक करतानाच भाजपने महाराष्ट्राचा केलेला बट्ट्याबोळ सगळ्या देशाने पाहिला असल्याचे नमूद केले. तेजस्वी आणि माझी याआधीही चर्चा होत असे पण अशारीतीने भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा मुलाखतीचा सिलसिला यापुढे देखील कायम राहील असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे बिहारमधील राजकारण चांगलेच तापले आहे. आदित्य यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीबाबत माध्यमांशी संवाद साधताना तेजस्वी म्हणाले की, ‘सध्याचा देश हा युवकांचा असून आम्ही सगळे मिळून युवकांसाठी काम करू.’

बिहारींबाबत बोलणे टाळले

महाराष्ट्रात बिहारींना होणाऱ्या विरोधाबाबत पत्रकारांनी विचारले असते आदित्य यांनी त्यावर स्पष्टपणे बोलणे टाळले. बिहारचे लोक मेहनतीच्या बळावर स्वतःचे नाव उज्ज्वल करतात. आज ज्या पद्धतीने बिहारमध्ये माझे स्वागत झाले ते मी कधीही विसरू शकत नाही. पाटण्यातील स्वागताचा क्षण सदैव माझ्या स्मरणात राहील, असेही आदित्य यांनी नमूद केले.