esakal | अफगाण लष्करप्रमुख भारतात येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Vali Mohammad Ahmadzai

अफगाण लष्करप्रमुख भारतात येणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल/नवी दिल्ली - अफगाणिस्तानचे (Afganisthan) लष्करप्रमुख जनरल वली महंमद अहमदझाई (Vali Mohammad Ahmadzai) पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर (India Tour) येण्याची अपेक्षा आहे. अमेरिका आणि मित्र देशांचे सैन्य परतल्यानंतर तालिबानी दहशतवादी (Talibal Terrorist) अफगाणिस्तानमध्ये आक्रमकपणे मुसंडी मारत आहेत. या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय लष्करी आणि संरक्षण सहकार्याला चालना देण्याचा या दौऱ्यामागील उद्देश आहे. (Afghan Army Chief Vali Mohammad Ahmadzai to Visit India)

पुढील मंगळवारपासून (ता. २७) सुरु होणारा हा तीन दिवसांचा हा दौरा दूरगामी परिणाम साधणारा असेल. जनरल अहमदझाई भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी व्यापक विषयांवर चर्चा करतील. या घडामोडींशी संबंधित एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

हेही वाचा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू नाही - केंद्र सरकार

एक मे रोजी अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेण्यास अमेरिकेने प्रारंभ केला. त्यानंतर तालिबानने कारवाया वाढविल्या आहेत. अनेक ठिकाणी अफगाणिस्तानच्या जवानांना माघार घेणे भाग पडले आहे. यामुळे सुरक्षा दलांची क्षमता भक्कम होण्याच्यादृष्टिने अफगाणिस्तान महत्त्वाच्या मित्र देशांची साथ घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

गेल्याच महिन्यात अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी जनरल यासीन झिया यांच्याऐवजी अहमदझाई यांची नियुक्ती केली.

पाकबरोबर तणाव

पाकिस्तानमधील अफगाणिस्तानचे राजदूत नजीबउल्लाह अखिल यांची कन्या सिलसिला हिचे इस्लामाबादमध्ये अपहरण करण्यात आले. तिची सुटका करण्यात आली, मात्र त्याआधी तिचा छळ करण्यात आला होता. या घडामोडीमुळे अफगाणिस्तानचे पाकबरोबरील संबंध ताणले गेले आहेत.

इम्रानच्या उपस्थितीत घनींची टीका

गेल्या शुक्रवारी ताश्कंदमध्ये सहकार्य परिषद झाली. त्यावेळी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत घनी यांनी परखड टीका केली. पाकने अफगाणिस्तानमध्ये गेल्या महिन्यात दहा हजारहून जास्त परकीय दहशतवादी घुसविले तसेच शांतता प्रक्रियेत तालिबानने गांभीर्याने सहभागी व्हावे म्हणून पुरेसा प्रभाव टाकला नाही.

तालिबानविरुद्धच्या संघर्षात तोडगा निघावा म्हणून कतारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या गेल्या वर्षापासू झाल्या आहेत, मात्र अद्याप कोणताही समेट झाला नसून हिंसाचार कायम आहे.

हेही वाचा: 67 टक्के भारतीयांमध्ये अँटीबॉडीज; 40 कोटी लोकांना अजूनही धोका

लष्करी पातळीवर मदत

गेल्या काही वर्षांत भारताने अफगाणिस्तानला किमान पाच लष्करी हेलिकॉप्टर दिली. हवाई दलाची क्षमता वाढविण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न आहे. उड्डाणाच्या स्थितीत नसलेली सोव्हिएत काळातील हेलिकॉप्टर आणि मालवाहू विमाने कार्यान्वित करण्यासाठीही भारताची मदत घेतली जात आहे. रशियावर पाश्चात्त्य देशांनी निर्बंध घातल्यामुळे विमान आणि हेलिकॉप्टरचे सुटे भाग मिळण्यात अफगाणिस्तानला अडचणी येत आहेत. या दौऱ्यात जनरल अहमदझाई लष्करी हार्डवेअरचा पुरवठा करावा अशी विनंती करण्याची शक्यता आहे.

शांतता प्रक्रियेला पाठिंबा

अफगाणिस्तानमध्ये शांतता, सलोखा व स्थैर्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून भारत हा महत्त्वाचा सहकारी राहिला आहे. तेथील मदत आणि पुनर्बांधणी उपक्रमांसाठी भारताने यापूर्वीच तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. अफगाण नेतृत्वाखाली, अफगाणी मालकीची आणि अफगाणी नियंत्रणाची राष्ट्रीय शांतता आणि सलोखा प्रक्रिया सुकर व्हावी म्हणून भारताने पाठिंबा दिला आहे.

loading image