esakal | बंगाली दुर्गापूजेत ऐकू येणार अफगाणी सूर
sakal

बोलून बातमी शोधा

बंगाली दुर्गापूजेत ऐकू येणार अफगाणी सूर

बंगाली दुर्गापूजेत ऐकू येणार अफगाणी सूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोलकता: संगीताला देश, भाषा, सीमा आदी कसलेही अडथळे नसतात, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय नवरात्रीत कोलकतावासियांना येणार आहे. उत्तर कोलकत्यातील दुर्गा पूजा समितीने मूळच्या अफगाणिस्तानातील पख्तूनमधील दोघा रहिवाशांचे संकल्पना गीत (थीम साँग) सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: अफगाण भूमीचा गैरवापर होण्याची भीती

तालिबान दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानवर कब्जा व संबंधित बातम्यांनी अवघ्या जगाची चिंता वाढविली आहे. या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यातील नवरात्रात पख्तुनी रहिवाशांचे सामाजिक सौहार्दाचे ‘सूर’ ऐकायला मिळतील. कोलकत्यातील बागुईती, केस्तोपूर, लेक टाऊन आणि डमडम पार्क परिसरातील नवरात्रीची पूजा लोकप्रिय आहे. येथील पूजेचे यंदा ४० वे वर्ष असून यावेळी अफगाणिस्तानातील या पख्तुनी नागरिकांच्या आवाजात पुश्तू भाषेत अफगाणिस्तानची पारंपरिक लोकगीते बंगाली भाविकांना ऐकायला मिळतील.

एकीकडे तालिबान अफगाणिस्तानचा ताबा मिळवीत असताना कोलकत्यातील अश्वनीनगर बंधू महाल क्लब या पख्तुनींच्या संपर्कात होता. क्लबच्या पूजा समितीचे प्रवक्ते स्वरूप नाग म्हणाले, की अफगाणिस्तानपासून हजारो किलोमीटरवर कोलकत्यातच राहणारे हे पख्तुनी सावकार आहेत. आपल्या रिकाम्या वेळेत त्यांनी गायनाचा छंद जोपासला आहे. या कार्यक्रमादरम्यान गीतांचे बंगालीमध्ये भाषांतर करण्याचेही पूजा समितीचे नियोजन आहे.

युद्धग्रस्त अफगाणिस्तानशी एकरूपतेची जाणीव

संगीतकार सम्राट भट्टाचार्य म्हणाले की, त्यांनी काही पख्तुनी (बंगालमध्ये काबुलीवाला) रहिवाशांना शहरातील त्यांच्या तळावर एकदा गाणी ऐकताना ऐकले. ही गाणी दीर्घकाळ त्यांच्या मनात होती. अश्वनीनगर क्लबने माझ्याशी संपर्क साधल्यानंतर या गाण्यांचे स्मरण झाले.

अफगाणिस्तानातील डोंगराळ प्रदेशातील त्यांची लोकगीते सादर करण्यासाठी पख्तुनींना तयार केले. नवरात्रीमध्ये मंडपात त्यांचे गायन भाविकांच्या हृदयाला स्पर्श करेल व युद्धग्रस्त अफगाणिस्तानशी एकरूपतेची जाणीव निर्माण करेल.

अफगाणिस्तानातील आमच्या या मित्रांना बंधुत्व व एकतेचा संदेश देण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला शांततापूर्ण सहजीवनाचा संदेश द्यायचा आहे, जो आमच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. - स्वरूप नाग, प्रवक्ते, पूजा समिती

loading image
go to top