बिहार निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल! तरुण चेहऱ्यांना संधी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 4 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी(एनई), केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) व संसदीय मंडळातील फेरबदलांचे वेगवान वारे वाहू लागतील, अशी चिन्हे आहेत.

दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी(एनई), केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) व संसदीय मंडळातील फेरबदलांचे वेगवान वारे वाहू लागतील, अशी चिन्हे आहेत. आगामी पश्‍चिम बंगाल निवडणुका लक्षात घेऊन व बिहारचा कल पाहून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. मात्र पक्षाने आता जास्तीत जास्त युवा चेहऱ्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यांतून बाहेर आणून राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याचे ठरविल्याचे सांगितले जात आहे. याच काळात नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचाही विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. देशाच्या सर्व भागांतील प्रतिनिधींना पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या टीममध्ये स्थान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने नुकत्याच नेमलेल्या कार्यालयीन पदाधिकाऱ्यांमधून व राज्य कार्यकारिणी सदस्यांमधून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रस्तावित फेरबदल करण्यात येतील. सध्या संसदीय मंडळासह महिला, युवा, अल्पसंख्याक आदी अनेक आघाड्या व कार्यकारिणीतील अनेक जागा रिक्त आहेत. जुन्या नव्यांचा मेळ घालताना नड्डा यांचा कस लागणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत तर मोठे फेरबदल शक्‍य असल्याचे सांगण्यात येते. तरुण पिढीला वाव देण्याच्या प्रक्रियेला भाजप गती देणार आहे. बिहार निवडणूक ही यापैकी काहींसाठीची लिटमस टेस्ट मानली जाते. 

गुजरात - केमिकल फॅक्ट्रीत स्फोटानंतर भीषण आग, 9 जणांचा मृत्यू

नड्डा यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्या टीममध्येही ५० टक्‍क्‍यांहून जास्त नवे चेहरे सत्तारूढ पक्षाने दिले आहेत. तोच कल संसदीय मंडळ, निवडणूक समिती व कार्यकारिणीतही दिसण्याची दाट शक्‍यता आहे. नवे पदाधिकारी निवडताना व खासदार तेजस्वी यादव यांना भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून पक्षनेतृत्वाने नड्डा यांच्यामार्फत ‘ज्येष्ठांना’ एक संदेश दिलेला आहेच. 

पक्षसूत्रांच्या माहितीनुसार, बिहारसह देशभरात होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या निकालाकडे भाजप नेतृत्वाची नजर आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा जनाधार वाढल्याचे स्पष्ट दिसत असले तरी त्याचा अर्थ भाजप-नितीशकुमार आघाडीला साफ अपयश येईल, असे नाही असे सांगितले जाते.

चिराग पासवान यांच्या कामगिरीवर लक्ष

चिराग पासवान यांच्या ‘लोजपा’च्या रूपाने बिहार निवडणुकीत असलेली भाजपची कथित ‘बी टीम' काय कामगिरी करते, यावरही सारे लक्ष अवलंबून असेल. मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीनंतर शिवराजसिंह मंत्रिमंडळासह राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्याप्रमाणे बदल केले जाऊ शकतात. आगामी बंगाल निवडणूक भाजपने बिहारपेक्षा प्रतिष्ठेची केल्याने त्या राज्यातून देखील राष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक चेहरे संघटनात्मक बांधणीत आणण्याचीही व्यूहरचना भाजपने आखली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after bihar election bjp will give opportunity to youth