गुजरात - केमिकल फॅक्ट्रीत स्फोटानंतर भीषण आग, 9 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

टेक्सटाइल गोदामाच्या शेजारी असलेल्या केमिकल युनिटमध्ये पहिल्यांदा स्फोट झाला. त्यानंतर टेक्स्टाइल गोदामाची इमारत कोसळली आणि आगही भडकली.

अहमदाबाद - बुधवारी गुजरातच्या अहमगदाबादमधील एका टेक्स्टाइल गोदामात आग लागल्यानं 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिपलाज रोडच्या नानूकाका इस्टेटमधील गोदामाला आग लागली. या आगीतून तीन लोकांना वाचवण्यात यश आलं. आगीमध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये इमारतीचा एक भाग कोसळला आहे. यामुळे मृत्यूची संख्या वाढल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता आहे. तसंच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

अहमदाबाद फायर अँड इमर्जन्सी सर्व्हीसच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक्सटाइल गोदामाच्या शेजारी असलेल्या केमिकल युनिटमध्ये पहिल्यांदा स्फोट झाला. त्यानंतर टेक्स्टाइल गोदामाची इमारत कोसळली आणि आगही भडकली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत. 

केमिकल युनिटमध्ये लागोपाठ 5 स्फोट झाले. दरम्यान टेक्स्टाइल गोदामाच्या मालकाने असे आरोप केले की, केमिकल फॅक्ट्री अवैध पद्धतीने चालवली जात होती. सध्या बचाव कार्य सुरू असून घटनास्थळी फॉरेन्सिक तपास करणारं पथकही दाखल झालं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat ahmadabad chemical factory fire death toll 9 rescue operation underway