
ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपसोबत सामील असलेल्या सरकारमधून जदयू आपलं समर्थन काढून घेणार आहे.
Manipur : बिहारपाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपला मोठा धक्का; आमदार काढून घेणार पाठिंबा
मणिपूर : देशातल्या विविध राज्यांत भाजप 'ऑपरेशन लोटस्' राबवत असतानाच काही राज्यांत भाजपला मोठा फटका बसताना दिसतोय. एनडीए म्हणजेच भारतीय जनता पक्षप्रणीत नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मधून नितीश कुमारांचा (Nitish Kumar) जनता दल यूनायटेड (JDU) बाहेर झाला आहे. आता मणिपूर (Manipur) राज्यातही जदयू पक्ष भाजपची (BJP) साथ सोडणार असल्याचं कळतंय.
ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपसोबत सामील असलेल्या सरकारमधून जदयू आपलं समर्थन काढून घेणार आहे. अजूनही हा निर्णय घेण्यात आलेला नाहीय. मात्र, लवकरच जदयूकडून हा निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मणिपूर जदयूचे अध्यक्ष केएसएच बीरेन सिंह (Biren Singh) म्हणाले, आम्ही सरकारमधून समर्थन काढून घेण्याबाबत विचार करत आहोत. 3 आणि 4 सप्टेंबरला बिहारच्या राजधानीत पाटना इथं होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची गाठभेट घेणार आहेत.'
भाजपला जदयूच्या 6 आमदारांचं समर्थन
आम्ही 2 सप्टेंबरला पाटना दौऱ्यावर निघणार आहोत, पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत सामील होणार आहोत,' अशी माहिती बीरेन सिंह यांनी दिली. राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला 32 जागा, स्थानिक नॅशनल पीपल्स पार्टीला ७ जागा आणि त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून जदयूला 6 जागा मिळाल्या आहेत. यानंतर जदयूनं भाजपला समर्थन देऊन सरकार स्थापन केलं होतं. या दरम्यान कांग्रेस और नागा पीपल्स फ्रंट यांना ५-५ जागा मिळाल्या होत्या. कुकी पीपल्स आघाडीला 2 जागा, तर 3 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. सद्यस्थितीत भाजपकडं जदयूच्या 6 आमदारांसह 55 आमदारांचं समर्थन आहे. मात्र, जदयूचे आमदार पाठिंबा काढून घेणार असल्याचं कळतंय.