"इंदिरा गांधींच्या लेह भेटीनंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले; आता मोदी काय करतात ते पाहुया?"

After Indira Gandhis visit to Leh Pakistan was divided into two parts
After Indira Gandhis visit to Leh Pakistan was divided into two parts

लेह- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. मोदींची लेह भेट अनपेक्षित होती. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्यांच्या या भेटीमुळे राजकारण सुरु झाल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लेह भेटीवरुन मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लेहला भेट दिली होती, तेव्हा पाकिस्तानचे दोन भाग झाले होते. आता मोदी काय करतात ते पाहुया? असं म्हणत तिवारी यांनी निशाणा साधला आहे.  त्यांनी इंदिरा गांधी यांचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो भारत-पाकिस्तानमधील 1971 च्या युद्धा अगोदरचा आहे. ज्यात इंदिरा गांधी लेहमध्ये सैनिकांना संबोधित करताना दिसत आहेत. 

लडाखमधील मातीचा छोटासा कणही भारताचा अभिन्न अंग- नरेंद्र मोदी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी सुरक्षा प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या समवेत लेहला भेट दिली. मोदी सकाळी साडे नऊ वाजता लेह येथे पोहोचले होते. मोदी यांनी निमु येथील एका फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. येथे त्यांनी वायुसेना, थलसेना आणि आईटीबीपीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. निमू हे 11,000 फुट उंचीवर असून सगळ्यात दुर्गम स्थानापैकी एक मानले जाते. निमू जंस्कार पर्वत श्रृंखलांनी घेरलेलं आहे. मोदींनी भारतीय जवानांना यावेळी संबोधित केले. 

भारतीय जवानांचे बाहू पर्वतासारखे मजबूत आहेत. जवानांचे शौर्य आणि साहस,  माँ भारतीच्या सुरक्षेसाठीचे त्यांचे समर्पन अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही इतक्या उंचीवर देशाच्या सुरक्षेसाठी ढाल बनून उभे आहात, त्याची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. तुमचा निश्चय या पर्यतांच्या कठोरतेपेक्षाही अधिक आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे मीआणि सर्व भारतवासी निश्चिंत आहोत. तुम्ही जे शौर्य दाखवले आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला आपली ताकद काय आहे याची प्रचिती आली आहे असं म्हणत मोदींनी जवानांचे धैर्य वाढवले.

मोदींच्या मनात नेमकं काय सुरुय? चीनला दणका देण्याचा विचार?
गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनदरम्यान तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांनी जमवाजमव सुरु केली आहे. तसेच शस्त्रास्त्रांची आवकही सीमा भागात वाढवण्यात आली आहे. यामुळे उभय देश युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी तयारी करत असल्याचं दिसत आहे. त्यात मोदी यांनी लेहमधील सैनिकांशी संवाद साधून त्यांचे धैर्य वाढवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीला विशेष महत्व आहे. 

दरम्यान, भारताने चीनला धडा शिकवण्याचे काम सुरु केले आहे. 59 चिनी अॅप्सवर भारत सरकारने बंदी आणली आहे. तसेच चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे भारताने चीनविरोधात कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. आता भारत सरकारची पुढील रणनीती काय असेल? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com