कृषी कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ; राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 6 February 2021

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटनांनी आज (दि.6) देशभरात चक्का जाम आंदोलन सुरु आहे.

नवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. हजारोंच्या संख्येनं पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक केला होता. मुलं, महिला आणि पुरुष पायी, गाड्यांनी आणि ट्रॅक्टरमधून चक्का जाम आंदोलनस्थळी पोहोचले होते. शेतकऱ्यांनी सांगितलं की, जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल. शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, आंदोलन बराच काळ सुरु राहिल. जर सरकारला वाटत असेल की जास्त काळ आंदोलन केल्यास विरोध मावळेल तर हा गैरसमज आहे. 

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला. दिल्लीत 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिस कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. दुसरीकडे बंगळुरु येथील येलहंका पोलिस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी म्हटलं की, जर सरकारने तीनही कृषी कायद्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत मागे घेतलं नाही तर पुढच्या रणनितीवर काम सुरू करेन. आम्ही 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. दबावाखाली सरकारसोबत कोणतीही चर्चा करणार नाही. कृषी कायदे मागे घ्या आणि एमएसपीवर कायदा तयार करा नाहीतर आंदोलन सुरुच राहिल. आम्ही पूर्ण देशात यात्रा काढू आणि देशभरात आंदोलन होईल. 
 

- बंगळुरु- येलहंका पोलिस ठाण्यासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

- अमृतसर - मोहाली येथे शेतकऱ्यांनी रस्ता बंद केले आहे.

- राजस्थान-हरियाणा सीमेवर शाहजहाँपूर येथे शेतकऱ्यांनी चक्का जाम सुरु केले आहे. 

- मंडी हाऊस, आयटीओ आणि दिल्ली गेट मेट्रोचे गेट बंद

- दिल्लीत येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. जागोजागी पोलिसांची पथके उभी असल्याचे सहपोलिस आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture law farmers chakka jam live update farmers agitation rakesh tikait