पैगंबरांच्या कार्टूनप्रकरणी ओवैसींची प्रतिक्रिया; खूप त्रास झाला, पण...

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 2 November 2020

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी फ्रान्समधील दहशतवादी घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली- प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या कार्टुनवरुन फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये दहशतवादी घटना घडल्या आहेत. जगभरातील काही मुस्लीम देशांनी फ्रान्समधील हत्त्यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी याचा निषेध केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी फ्रान्समधील दहशतवादी घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फ्रान्समधील दहशतवादी घटनांना चुकीचे ठरवले आहे. 

प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे कार्टुन पब्लिश झाल्याने मला खूप त्रास झाला आहे, पण कोणत्याही परिस्थितीत फ्रान्समधील घटनांचे समर्थन करणार नाही. दहशतवादी घटना पूर्णपणे चुकीच्या आहेत. जिहादच्या नावाखाली निर्दोश लोकांची हत्या करणारे केवळ खुनी असतात. इस्लाम याचे समर्थन करत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात, त्या ठिकाणच्या कायद्यांचे तुम्ही पालन करायला हवे. तुम्ही कोणाचाची जीव घेऊ शकत नाही, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. 

राज्यसभेत 10 उमेदवार बिनविरोध; भाजपची 8 जागांवर बाजी

काही दिवसांपूर्वी उर्दू शायर मुनाव्वर राणा यांनी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची घटना योग्य असल्याचे म्हटले होते. पैंगबर मोहम्मद यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणाऱ्याबरोबर असंच व्हायला हवे. जर कोणी आमच्या आईचे किंवा वडिलांचे व्यंगचित्र काढत असेल तर त्याला मारले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी  उत्तर प्रदेश पोलिसांनी राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. धार्मिक भावना भडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लखनऊ येथील हजरतगंज कोतवाली येथे आयपीसीच्या अनेक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे पार्श्वभूमी?

2015 साली मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल फ्रान्समधील शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता ज्यात अनेक पत्रकार मारले गेले होते. जगभर या कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला होता. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपूर्वी फ्रान्समधील एका शिक्षकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर वर्गात चर्चा करताना ही काही व्यंगचित्रे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवली होती, ज्यामुळे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यामळे व्यंगचित्र आणि फ्रान्समधील दहशतवादी हल्ले हा प्रकार पुन्हा एकदा वर आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aimim chief asasuddin owaisi comment on peganbar cartoon