
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम यांच्या विक्रीबाबतचं सरकारचं धोरण स्पष्ट केलं आहे.
दिल्ली : सध्या देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे चित्र. सरकारी धोरणे देखील त्यामुळे बदलताना दिसत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम यांच्या विक्रीबाबतचं सरकारचं धोरण स्पष्ट केलं आहे. मार्चपर्यंत या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीतारमण म्हणाल्या की, आर्थिक मंदीतून बाहेर येण्याकरता काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आतापर्यंत अनेक पावलं उचलली गेली आहेत. या दोन कंपन्यांच्या विक्रीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे मार्चपर्यंत या कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. एअर इंडियासाठी विक्री प्रस्ताव गेल्यावर्षीच निश्चित झाला होता.
मात्र, गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. यावर्षी या प्रक्रियेसाठी गुंतवणूकदारांनीच उत्साह दाखवला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि त्यावरील उपाय यांबाबतही सीतारमण यांनी या मुलाखतीत सविस्तर सांगितलं. त्या म्हणाल्या की, काही क्षेत्रांमध्ये नियमन केल्याने जीएसटीतून होणाऱ्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येतील.
सर्वोच्च न्यायालयाचा एस्सार स्टील प्रकरणावरील निकाल पाहता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या निकालामुळे पुढील तीन महिन्यात बँकांच्या बॅलन्सशीटवर दिसून येतील. सणासुदीच्या निमित्ताने कर्जांची देवाणघेवाण हेही एक आशादायक चित्र असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं आहे.