Ajit Pawar
Ajit Pawar Sakal

Ajit Pawar : राज्यमंत्रिपद नको, कॅबिनेटच हवे राष्ट्रवादी काँग्रेस ठाम, विस्ताराची वाट पाहणार

शपथविधीआधी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या नव्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी नव्हता.

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही प्रतिनिधी नाही. मर्यादित खासदार संख्येच्या निकषामुळे मंत्रिमंडळात स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्रिपदाचा भाजपने दिलेला प्रस्ताव अजित पवार यांच्या पक्षाने नाकारला आहे. वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळावे, अशी आग्रही मागणी करताना त्यासाठी वाट पाहण्याची तयारी असल्याचे पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्लीत जाहीर केले.

लवकरच राज्यसभेमध्ये पक्षाचे आणखी दोन खासदार निवडून येतील आणि त्यानंतर पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेला नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असले तरी दुपारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला उशिरापर्यंत मंत्रिमंडळात सहभागासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून दूरध्वनी गेला नव्हता.

शपथविधीआधी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या नव्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी नव्हता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चार खासदारांमागे एक मंत्रिपद या निकषाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र कार्यभार असलेल्या राज्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह कॅबिनेट मंत्रिपदासाठी होता. शिवाय, मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. दिल्लीतील प्रदीर्घ अनुभवाचा दाखला देत प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिपदावर दावा केला. तर, पक्षाचे मंत्रिपद लोकसभेतील प्रतिनिधीला असावे, असा सुनील तटकरे यांचा आग्रह होता.

त्यापार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठकही झाली. मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्वितचर्वण सुरू असताना यात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील सहभागी झाले होते. अखेरीस, ज्येष्ठत्वाच्या निकषाच्या आधारे प्रफुल्ल पटेल यांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळावे आणि लगेच ते शक्य नसेल तर पुढील विस्ताराची वाट पाहण्याची तयारी असल्याची भूमिका घेण्यात आली.

भाजप नेत्यांशी चर्चा

बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकारांसमोर निर्णयाची माहिती दिली. मंत्रिमंडळातील सहभागाबाबत ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथसिंह आणि अमित शहा यांनी चर्चा केली होती. त्याबाबत अजित पवार यांनी सांगितले, ‘‘लोकसभा आणि राज्यसभा मिळून पक्षाचे दोन खासदार आहेत.

दोन-तीन महिन्यांत राज्यसभेच्या आणखी दोन जागा वाढतील. त्यामुळे मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाची एक जागा मिळावी, अशी मागणी केली. मंत्रिमंडळ विस्तारात प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळावे, यासाठी थांबण्याची तयारी आहे.’’ ‘एनडीए’मध्ये असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनीच काम करणार, अशीही पुस्ती अजित पवार यांनी जोडली.

विधानसभा निवडणुकांसाठी दौरे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाली असून लवकरच पक्षाचे नेते राज्यात दौरे सुरू करतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ‘‘अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि राज्यघटना बदलाचा मुद्दा याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला.

ही परिस्थिती बदलण्यासाठी पक्षाचे नेते जनसंपर्क करतील आणि महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी धीरज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com