Akhilesh Yadav : भाजप, काँग्रेस एका माळेचे मणी; अखिलेश यादव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav statement BJP Congress are beads of garland rahul gandhi congress bharat jodo yatra

Akhilesh Yadav : भाजप, काँग्रेस एका माळेचे मणी; अखिलेश यादव

लखनौ : भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे एका माळेचे मणी आहेत. आमच्या पक्षाची विचारसरणी मात्र वेगळी आहे, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पुन्हा प्रारंभ होत आहे. तीन जानेवारी रोजी दिल्लीनंतर उत्तर प्रदेशचा टप्पा सुरु होणार आहे. त्यासाठी आमंत्रण मिळाले आहे का, या प्रश्नावर अखिलेश म्हणाले की, ‘विरोधी पक्षांच्या युतीला चालना देणारा बिंदू ठरण्याची शक्यता काँग्रेसच्या यात्रेने संपुष्टात आणली आहे.‘

‘तुमच्या फोनवर आमंत्रण आले असेल तर कृपया मला ते पाठवा,‘ अशी टिप्पणीही त्यांनी पत्रकारांना उद्देशून केली. यात्रेसाठी आमच्या भावना आहेत, पण मला आमंत्रण मिळाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसच्या सूत्रांनी मात्र अखिलेशच नव्हे तर युत्तर प्रदेशमधील बसपच्या प्रमुख मायावती यांनाही आमंत्रण दिल्याचा दावा केला आहे. अखिलेश, मायावती यांच्यासह सपचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) प्रमुख जयंत चौधरी यांनीही यात्रेत सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

सप आणि काँग्रेस यांच्या युतीला २०१७ मध्ये दारुण अपयश आले. त्यानंतर ही युती या वर्षातील निवडणुकीपूर्वी संपुष्टात आली. काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर सपने १११ जागांपर्यंत मजल मारली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भक्कम आव्हान निर्माण करायचे असल्यास काँग्रेसला मित्रपक्षाची गरज लागू शकते. विधानसभेचे निकाल बघता अखिलेश यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

दुसरीकडे मायावती यांनीही अलीकडे काँग्रेसवर कडवी टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या बाजूने वक्तव्य केले आहे. काँग्रेसला पाठिंबा म्हणजे भाजपविरोधी मतांमध्ये अकारण फूट पाडण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

युतीबाबत तर्क नको : तिवारी

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात पूर्वी अनेकदा युती झाली आहे. अगदी २०१७च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे दोन पक्ष एकत्र होते. २००८ मध्ये मनमोहन सिंग यांचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना सपनेच त्यांना तारले होते.

या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र युती संपुष्टात आला. आता युतीची शक्यता आहे का, या प्रश्नावर सपचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी स्पष्ट केले की, युतीच्या शक्यतेवरून मला कोणत्याही तर्कवितर्कांना वाव देण्याची इच्छा नाही.

टॅग्स :BjpAkhilesh YadavCongress