अखिलेश यांना रोखल्याचे यूपीत पडसाद; सपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

- विधिमंडळातही गदारोळ
- सपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
- विद्यापीठाच्या कार्यक्रमाला जाताना विमानतळावरच अडवल्याचे यूपीत पडसाद 

लखनौ : अलाहाबाद विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी जाताना लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना रोखल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले. यावेळी सपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. या घटनेचे पडसाद संसद अधिवेशन आणि उत्तर प्रदेश विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या वेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आज सकाळी अलाहाबाद विद्यापीठात एका विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी जाण्यासाठी अखिलेश यादव हे चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. मात्र, विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. यासंदर्भातील छायाचित्र अखिलेश यादव यांनी ट्‌विटरवरून प्रसिद्ध केले.

अखिलेश यादव यांना रोखल्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखल्याचे समजताच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला. समाजवादी पक्षाचे नेते नरेंद्र वर्मा म्हणाले, की सध्याच्या सरकारकडून लोकशाहीची हत्या केली जात असून, आमच्या नेत्यांना अलाहाबादला जाण्यापासून रोखण्यात आले. या वेळी समाजवादी पक्षाचे आमदार वेलमध्ये येऊन घोषणा देऊ लागले. अध्यक्ष नरेन दीक्षित यांनी 20 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

त्यानंतर, सभागृहाचे कामकाज सुरू होताच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्येच धरणे आंदोलन सुरू केले. योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध घोषणाबाजी करू लागले. "योगी तेरी तानाशाही नहीं चलेगी' अशा घोषणा दिल्या. बसप नेते लालजी वर्मा यांनीही समाजवादी पक्षाच्या आंदोलनात सहभाग घेऊन आदित्यनाथ सरकारवर टीका केली. दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी या घटनेचा अहवाल मागितल्याचे सांगितले. 

समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक 
अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखल्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यातील अनेक भागांत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या बाहेर सप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच अलाहाबाद, जौनपूर, झासी, कनौज, बलरामपूर, जालून, आझमगड, गोरखपूर यांसह अनेक भागांत सप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. गोरखपूर येथील रस्ते रोखून धरले होते. अलाहाबाद येथे आंदोलनदरम्यान खासदार धर्मेंद्र यादव जखमी झाले. 

अखिलेश यादव यांची नाराजी 
अखिलेश यादव म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला जाता आले नाही, याचे दु:ख आहे. मात्र, सरकारची नियत स्वच्छ नाही. विद्यापीठाचा कार्यक्रम बरेच महिने अगोदर निश्‍चित झाला होता. विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनीदेखील प्रशासन अधिकारी आणि कुलगुरूंच्या भेटीनंतरच या कार्यक्रमाची तारीख दिली होती. काली रात्री काही अधिकाऱ्यांनी माझ्या घराची रेकी केल्याचेही समजले आहे. सकाळी सहाच्या सुमारास तीन अधिकारी माझ्या घराजवळ येऊन थांबले होते. त्यांचे येण्याचे कारण आपल्याला माहीत नाही. विमानतळ परिसरात उत्तर प्रदेशचे पोलिस येऊ शकत नाही. तरीही त्यानंतर सरकारची हिंमत पाहा, मला उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी विमानात बसू दिले नाही. यामागे केंद्राचा हात असल्याचाही त्यांनी आरोप केला. 

अखिलेश यादव यांच्या भेटीमुळे विद्यार्थी संघटनांत हिंसाचार होण्याची शक्‍यता वर्तविली गेली होती. त्यामुळे अलाहाबाद विद्यापीठाने अखिलेश यादव यांचा दौरा थांबवण्याची विनंती सरकारकडे केली होती आणि त्यानुसार सरकारने कार्यवाही केली.- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhilesh Yadav Stopped At Airport Lathicharge On Samajwadi Protesters