
इंधनाऐवजी हरियाना सरकारकडून मद्य स्वस्त
चंडीगड - महागाई कमी व्हावी म्हणून इंधनावरील कर कमी करण्याऐवजी हरियानातील मनोहरलाल खट्टर यांच्या भाजप सरकारने मद्य स्वस्त करून आपला प्राधान्यक्रम कशाला आहे हे स्पष्ट केले आहे. यातून तरुण व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढेल, असा इशारा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कुमारी सेलजा यांनी दिला. हरियाना मंत्रिमंडळाने नुकत्याच मंजूर केलेल्या नव्या अबकारी धोरणानुसार प्रतीबाटली आयातकर सात रुपयांवरून दोन रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. मद्यपानासाठी कायद्यानुसार अधिकृत वय यापूर्वीच २५ वरून २१ पर्यंत खाली आणण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सेलजा म्हणाल्या की, राज्यातील जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. पेट्रोल, इंधनावरील कर कमी करावा, इतर वस्तू स्वस्त कराव्यात अशी त्यांची मागणी आहे, पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकार मद्यनिर्मितीला कसे प्रोत्साहन देत आहे, याची विस्ताराने माहिती देताना त्या म्हणाल्या की, आता राज्यात मद्याचा कारखाना उभारणे सोपे आहे. त्यासाठी आधी १५ लाख रुपये परवाना शुल्क होते. आता ते केवळ एक लाख करण्यात आले. परदेशी मद्यावरील व्हॅट दहा वरून तीन टक्क्यांपर्यंत, तर देशी मद्यावरील व्हॅट १३-१४ वरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. बेरोजगारीच्या बाबतीत हरियानाचा देशात पहिला क्रमांक आहे. दर तीनमागे एक पदवीधर युवक बेरोजगार आहे, असा दावाही कुमारी सेलजा यांनी केला.
Web Title: Alcohol Cheaper Than Fuel From Haryana Government Vk11
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..