पुराव्याअभावी सर्व 28 आरोपींची मुक्तता 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

न्यायालयाचा निर्णय, रणवीर सेनेने केली होती दहा जणांची हत्या 
 

पाटणा - बिहारमध्ये दोन दशकांपूर्वी झालेल्या दहा दलितांच्या हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, गोळ्या लागून आमच्या नातेवाइकांचा जीव गेलेला असताना, आम्हीच साक्षीदार शोधून आणायचे काय? असा संतप्त सवाल पीडित कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित केला आहे. या पूर्वीही बिहारमध्ये झालेल्या दलित हत्याकांडातील सर्व आरोपींची पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे. 

पाटणा जिल्ह्यातील हैबसपूर गावात 23 मार्च 1997 रोजी रणवीर सेनेच्या हल्लेखोरांनी दहा दलितांची गोळ्या घालून हत्या केली होती. हत्या झाली त्या दिवशी या गावातील दलितांनी भगतसिंग यांची जयंती साजरी केली होती. गरीब जनतेवर हल्ले करणारी जमीनदारांची संघटना म्हणून रणवीर सेना ओळखली जात होती. 

हैबसपूरमधील दलितांच्या हत्याकाड प्रकरणातील सर्व 28 आरोपींना पुराव्याअभावी मुक्त करण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला. हे हत्याकांड झाले त्या वेळी बिहारमध्ये भाकप-माले आणि रणवीर सेनेदरम्यान जोरदार संघर्ष सुरू होता. या संघर्षात साडेतीनशेहून अधिक गरीब नागरिकांची हत्या करण्यात आली होती. त्यात महिला आणि लहान मुलांची संख्याही मोठी होती. 

दलितांनी सोडली न्यायाची आशा 
बहुचर्चीत लक्ष्मणपूर बाथे दलित हत्याकांड असो वा बथानी टोला येथील दलितांचा नरसंहार असो, या सर्व प्रकरणांमधील आरोपींची पुराव्यांच्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे. लक्ष्मणपूर बाथे येथे 59 आणि बथानी टोला येथे 14 दलितांची हत्या झाली होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दलित समुदायाने आता न्याय मिळण्याची आशा सोडून दिली आहे. 

Web Title: All 28 accused released due to no evidence