
Omicron : शाळा, सलून, मॉल्ससह सर्व बंद; बंगालमध्ये कठोर निर्बंध
कोलकाता : देशात ओमिक्रॉनमुळे (India Omicron Cases) कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल २७ हजार ५५३ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून पश्चिम बंगाल सरकारने कठोर निर्बंध (West Bengal Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पश्चिम बंगालच्या आरोग्य सचिवांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा: सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे
शाळा, महाविद्यालय, स्पा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, पार्क, झू सर्व बंद करण्यात येत आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच सरकारी खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्व बैठका ऑनलाइन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं पश्चिम बंगालचे आरोग्य सचिव एच. के. त्रिवेदी यांनी सांगितले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ओमिक्रॉनचे २० रुग्ण -
देशात डिसेंबर महिन्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ओमिक्रॉन रुग्णांची संख्या पाहता पाहता १५२५ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनची संक्रमण क्षमता जास्त आहे. त्यामुळे रुग्णसंख्या देखील झपाट्यानं वाढत आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे २० रुग्ण आढळून आले असून ४ रुग्ण बरे झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी ४ हजार ५१२ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच राज्यातील सक्रिय प्रकरणांची संख्या १३ हजार ३०० असून महाराष्ट्र आणि केरळ नंतर पश्चिम बंगाल देशातील तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशातील स्थिती काय? -
गेल्या २४ तासात देशात तब्बल २७ हजार ५५३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १५२५ वर पोहोचली असून महाराष्ट्रात सर्वाधिक ४६० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू आहे. तर महाराष्ट्रात काही निर्बंधसुद्धा लागू केले आहेत.
Web Title: All School Colleges Malls Closed Strict Lockdown In West Bengal Due To Omicron
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..