
"मोदींच्या घराबाहेर सर्वधर्मीयांना..."; राष्ट्रवादीचं अमित शाहांना पत्र
राज्यात सध्या हनुमान चालिसा पठणावरून मोठा गोंधळ सुरू आहे. या गोंधळात मनसे, शिवसेना, भाजपानंतर आता राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या पदाधिकारी फहमिदा हसन खान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मोदींच्या घराबाहेर सर्वधर्मीयांना प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
या पत्रात खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर नमाज, हनुमान चालिसा, नवकार मंत्र, गुरु ग्रंथ आणि नोवना अशा सर्वधर्मीय प्रार्थना करण्याची परवानगी द्यावी, तसंच तारीख आणि वार कळवण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आक्रमक शिवसैनिक आणि पोलीस यांनी अडवल्याने राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा पठण करता आलं नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फहमिदा खान यांनी लिहिलेलं हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Title: Allow All Religion To Pray Outside Modis Residence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..