अमरनाथ यात्रा स्थगित; भाविकांना परतीचे आवाहन

पीटीआय
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने आणि जम्मू-काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील यात्रेकरू आणि पर्यटकांनी तातडीने आपली यात्रा अथवा सहल संपवून परतावे, असे आवाहन जम्मू-काश्‍मीर सरकारने केले आहे. 

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने आणि जम्मू-काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील यात्रेकरू आणि पर्यटकांनी तातडीने आपली यात्रा अथवा सहल संपवून परतावे, असे आवाहन जम्मू-काश्‍मीर सरकारने केले आहे. 

जम्मू-काश्‍मीरच्या प्रधान सचिवांनी ही नोटीस जारी केली आहे. "गुप्तचर संस्थांनी दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता व्यक्त केली असून अमरनाथ यात्राच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. तसेच, राज्यातील एकूण परिस्थिती पाहता पर्यटक आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी त्यांनी काश्‍मीर खोऱ्यातून तातडीने बाहेर पडावे आणि माघारी जाण्याच्या दृष्टीने शक्‍य तितक्‍या लवकर सोय करावी,' असे आवाहन करण्यात आले आहे. 

यात्रामार्गावर भूसुरुंग आणि शस्त्रे 

अमरनाथ यात्रेला दहशतवादाचा धोका असल्याचा गुप्तचरांचा अहवाल आल्यानंतर लष्कराने यात्रामार्गावर सगळीकडे शोध मोहिम सुरु केली आहे. यावेळी लष्कराला यात्रामार्गावर पाकिस्ताननिर्मित भूसुरुंग आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आढळून आला. अत्याधुनिक स्फोटकांचा (आयईडी) वापर करून दहशतवादी हल्ला करण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले होते, असे लेफ्टनंट जनरल सरबजितसिंह धिल्लन यांनी सांगितले.

जवानांच्या 280 तुकड्या तैनात 

काश्‍मीर खोऱ्यात जवानांच्या 280 तुकड्या (एका तुकडीत शंभर जवान) तैनात करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश जवान हे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे असतील. श्रीनगरची चहूबाजूंनी नाकाबंदी केली असून येणाऱ्या-जाणाऱ्यांची अत्यंत कडक तपासणी होत आहे. काही दुर्गम भागातील धार्मिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. येथील जवानांवर हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amarnath Yatra Pilgrims Tourists Asked To Leave Jammu and Kashmir Amid Security Threat