अमित शहांच्या प्रकृतीबद्दल AIIMS ने दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

अमित शहांची गेल्या महिन्यात दोन ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हा त्यांच्यावर गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. 

नवी दिल्ली - कोरोनावर मात करून घरी परतलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडल्यानं उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. अमित शहांची गेल्या महिन्यात दोन ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हा त्यांच्यावर गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. 

याबाबत आता एम्स प्रशासनाने माहिती दिली आहे. अमित शहांच्या प्रकृतीबद्दल सांगताना एम्सने म्हटलं की, अमित शहा संसदेच्या अधिवेशनाआधी वैद्यकीय तपासणीसाठी पूर्ण चेकअप करण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांना शनिवारी रात्री 11 वाजता रुग्णालयात दाखल केलं होतं. 

एम्सने म्हटलं की, अमित शहा यांना डिस्चार्जवेळीच सल्ला देण्यात आला होता की पूर्ण चेकअप करून घ्यावे लागेल. त्यानुसार अधिवेशन सुरु होण्याआधी त्यांना चेक अपसाठी एक दोन दिवस रुग्णालयात दाखल करून घेतलं आहे. पावसाळी अधिवेशनाला सोमवार 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

हे वाचा - फेक फोटो शेअर केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या नेत्याला अटक

गेल्या महिन्यात मेदांता रुग्णालयात उपचारानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तेव्हा ठणठणीत बरे झाल्यानंतर 14 ऑगस्टला रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा चारच दिवसांनी 18 ऑगस्टला अशक्तपणामुळे एम्समध्ये दाखल केलं होतं. जवळपास दोन आठवडे ते एम्समध्येच होते. 31 ऑगस्टला अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah admitted in aiims yesterday night