भाजपकडून विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या राज्यप्रभारीपदी 'या' नेत्याची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव भाजपचे राज्य प्रभारी 
जावडेकर (दिल्ली), तोमर (हरियाना) माथूर (झारखंड)

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणूक निकालांच्या जबरदस्त धक्‍क्‍यातून कॉंग्रेस व विरोधक सावरलेले नसतानाच, भाजप नतृत्वाने मात्र या वर्षात होऊ घातलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची सुपरफास्ट पूर्वतयारी सुरू केली आहे. भाजपाध्यक्ष शहा यांनी आज महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा व झारखंडसाठी निवडणूक प्रभारींची नियुक्‍त्या आज जाहीर केल्या.

खासदार भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी करण्यात आले असून यूपीचे केशवप्रसाद मौर्य व कर्नाटकचे लक्ष्मण सावदी यांना सहप्रभारी करण्यात आले आहे. राजस्थानातील सर्वच्या सर्व लोकसभा जागा पक्षाच्या पदरात घालणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर आता दिल्लीची अवघड जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

महाष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभेवेळी औरंगाबादमधील अपघातानंतर रावसाहेब दानवे यांना केंद्रात माघारी बोलावण्यात आले व चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. 
 
महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनाकायम ठेवतानाच विधानसभेसाठी यादव यांच्याकडे राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यादव यांच्या जोडीला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री के पी मौर्य व कर्नाटकातील लक्ष्मण सावदी यांना सहप्रभारी म्हणून देण्यात आले आहे. 

दिल्लीत गेली सुमारे दोन दशके (सुषमा स्वराज सरकारनंतर) सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपसमोर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे डोंगराएवढे मोठे आव्हान आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गत गटबाजीही येथे भरपूर आहे. दिल्लीतच सारे आयुष्य गेलेले व केजरीवाल यांच्या अवास्तव योजनांना ठामपणे अटकाव करणारे नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी व केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांना सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहे.

दिल्लीत मोफत वीज, मोफत वाय फाय तसेच महिलांना मोफत मेट्रो व बसप्रवास असे तीन षटकार निवडणुकीआधीच मारणारे केजरीवाल यांच्यासमोर जावडेकर यांना नवीन डावपेच आखावे लागतील असे जाणकार मानतात. अस्सल मराठीच असलेले दिल्लीचे प्रभारी श्‍याम जाजू यांना कायम ठेवण्यात आले आहे ही जावडेकरांसाठी जमेची बाब ठरू शकते. 

महाष्ट्राप्रमाणेच भाजपची सत्ता असलेल्या हरियाणा व झारखंडमध्येही निवडणूक प्रभारींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. झारखंडमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष ओमप्रकाश माथुर हे प्रभारी तर बिहारचे मंत्री नंदकिशोर यादव सहप्रभारी असतील. हरियाणामध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर प्रभारी व यूपीतील मंत्री मंत्री भूपेंद्रसिंह सह-प्रभारी असतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah appoints Bhupendra yadav as election in-charge for for Maharashtra