प. बंगालमध्ये आणखी एका संकटाची चाहूल; शहा-ममतादीदी यांच्यात 'फोन पे चर्चा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 मे 2020

पश्चिम बंगालच्या दिशेने येऊ पाहणाऱ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.  

नवी दिल्ली : देशात कोरोनाजन्य परिस्थितीने चिंतेचे वातवरण निर्माण झाले असताना आता 'अम्फान' चक्रीवादळाचे संकट धडकले आहे. 'अम्फान' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 20 मे रोजी 'अम्फान' चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या समुद्र किनाऱ्यावर धडकरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.  

कोरोनाच्या लसीबाबत महत्त्वाची बातमी...

 आगामी धोकादायक चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकार योग्य ती मदत करेल, असे आश्वासन अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना दिले आहे.  अमित शहा म्हणाले की, संकटकाळात केंद्र सरकार पश्चिम बंगाल राज्याला मदत करण्यास तयार आहे. आगामी संकटाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथक (NDRF) पाठवण्यात आले असून राज्याला आवश्यक ती मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असेही अमित शहांनी म्हटले आहे.  

अमेरिका-चीन यांच्यात पुन्हा तणाव; कारण वाचा सविस्तर

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालमधील दीघापासून 670 किमी अंतरावरील बंगालच्या खाडीत मोठे चक्रीवादळ निर्माण होणार आहे. 'अम्फान' चक्रीवादळ 20 मे रोजी पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशमधील हटिया येथे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर धडकल्यानंतर याठिकाणी मोठी हानी देखील होऊ शकते. चक्रीवादळाच्या दरम्यान हवेचा वेग 155 ते 165 किमी प्रति तास इतका असू शकतो. तसेच तो 180 किमी प्रति तास इथपर्यंत नोंदवला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम मध्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या खाडीत ताशी 240 ते 250 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर  पश्चिम बंगालमध्ये 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आले आहे. कोलकाता, हुगली, हावडा, दक्षिण आणि उत्तर 24 परगना आणि पूर्वी मिदनापुर जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah Calls Up Mamata Banerjee Over Cyclone Amphan