Amit Shah Vijay meeting : अमित शाह, विजय यांची गुप्त भेट? दक्षिणेतील ५ राज्यांचा वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी लागणार; आज मोठी बैठक

Amit Shah Tamil Nadu CM Vijay : अमित शाह आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची भेट चर्चेत आली आहे. दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीत पाच राज्यांमधील जुने प्रश्न आणि पाणीवाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Amit Shah Vijay meeting

Amit Shah Vijay meeting

esakal

Updated on

Tamil Nadu Karnataka water dispute : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी होणाऱ्या ३१व्या दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची चेन्नई येथे भेट घेतली. ही बैठक चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे होणार आहे. अमित शहा यांनी या भेटीचे छायाचित्रे ‘एक्स’वर शेअर केली आहेत.

दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीला तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यांचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, आंतरराज्य परिषदेच्या सचिवालयाचे सचिव तसेच केंद्र आणि राज्य सरकारांतील वरिष्ठ अधिकारीही बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत दक्षिणेकडील राज्यांमधील परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. प्रलंबित आंतरराज्यीय प्रश्न, पाणीवाटपाचे वाद, प्रादेशिक विकास आणि राज्यांमधील समन्वय यांसारखे विषय बैठकीच्या अजेंड्यावर असतील.

नदीजोड प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता

३१व्या दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री विजय हे गोदावरी-कृष्णा-पेन्नार-पलार-कावेरी नदीजोड प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. तामिळनाडूचे जलसंपदा मंत्री एन. आनंद यांनी सांगितले की, राष्ट्रीय जलविकास संस्थेच्या (NWDA), नदीजोड प्रकल्पावरील विशेष समिती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

यापूर्वी विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जलशक्ती मंत्रालय आणि NWDAला संबंधित राज्यांशी चर्चा वेगाने पूर्ण करून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. जलसंपदा मंत्री आनंद यांनीही आंध्र प्रदेशच्या जलसंपदा मंत्र्यांशी संपर्क साधून प्रकल्पासाठी राज्याची सहमती मिळवण्याची मागणी केली आहे.

कावेरी खोऱ्यातील परिस्थितीबाबतही तामिळनाडू सरकारने चिंता व्यक्त केली आहे. भूजल पातळीत घट, समुद्राचे खारे पाणी भूजलात शिरणे, सिंचन व्यवस्थेची खराब झालेली पायाभूत सुविधा, हवामानातील बदल आणि नदीतील पाण्याचा घटलेला प्रवाह या समस्यांकडे सरकारने लक्ष वेधले आहे.

मागील बैठकीत २६ मुद्द्यांवर चर्चा

दक्षिण विभागीय परिषदेची ३०वी बैठक तिरुवनंतपुरम येथे झाली होती. या बैठकीत एकूण २६ मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यापैकी नऊ मुद्दे निकाली काढण्यात आले, तर १७ मुद्दे पुढील विचारासाठी प्रलंबित ठेवण्यात आले. यातील नऊ मुद्दे आंध्र प्रदेशच्या पुनर्रचनेशी संबंधित होते.

मागील बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अमित शहा यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने जनतेच्या हितासाठी प्रलंबित प्रश्न परस्पर चर्चेतून सोडवावेत, असे आवाहन केले होते. तसेच नदीच्या पाणीवाटपाशी संबंधित प्रश्नांवर सदस्य राज्यांनी एकत्रितपणे तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

दक्षिण विभागीय परिषद म्हणजे काय?

राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ अंतर्गत देशात उत्तर, मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा पाच विभागीय परिषदा स्थापन करण्यात आल्या. राज्यांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढवणे हा या परिषदांचा मुख्य उद्देश आहे.

या परिषदांमध्ये आर्थिक व सामाजिक नियोजन, आंतरराज्यीय वाहतूक, सीमावाद, भाषिक अल्पसंख्याकांशी संबंधित प्रश्न तसेच अन्य सामायिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते. संबंधित प्रदेशातील राज्यांना एकत्र येऊन परस्पर प्रश्न सोडवण्यासाठी आणि व्यापक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी या परिषद महत्त्वाचे व्यासपीठ ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com