
दिल्लीच्या सीमावरील चिघळलेले शेतकरी आंदोलन, त्याला विरोधी सेलिब्रेटींकडून मिळणारा पाठिंबा, गाझीपूरच्या सीमेवर विरोधी पक्षनेत्यांनी दिलेली भेट आदी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी या बैठकीत चर्चा केल्याचे समजते.
नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शहा यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, दिल्ली पोलिस आयुक्त एस एन श्रीवास्तव, गुप्तचर यंत्रणांचे काही वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर संसदेतील आपल्या दालनात उच्चस्तरीय बैठक घेतली. दिल्लीच्या सीमावरील चिघळलेले शेतकरी आंदोलन, त्याला विरोधी सेलिब्रेटींकडून मिळणारा पाठिंबा, गाझीपूरच्या सीमेवर विरोधी पक्षनेत्यांनी दिलेली भेट आदी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी या बैठकीत चर्चा केल्याचे समजते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दुपारी साडेचारच्या आसपास सुरू झालेली ही बैठक पुढे किमान दोन तासांहून जास्त काळ चालल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, शहा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत डोवाल व संबंधितांबरोबर उच्चस्तरीय चर्चा केली.गेल्या ७१ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद, विशेषतः गाझीपूर सीमेवरील हजारो शेतकऱ्यांचे दररोज होणारे आगमन , त्यामुळे दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेसमोर निर्माण होणारे संभाव्य आव्हान, शेतकरी आंदोलनाला परदेशातील प्रसिद्ध व्यक्तींकडून मिळणारा पाठिंबा तसेच ब्रिटनसह काही देशांच्या संसदेमध्ये शेतकरी आंदोलनावर चर्चा घडवून आणण्याचे सुरू असलेले प्रयत्न या बाबींवर शहा यांनी यावेळी चर्चा केली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दिल्ली पोलिसांचा दावा
दिल्ली पोलिसांच्या दाव्यानुसार, आज नोंदविलेल्या गुन्ह्यात पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग वा इतर कोणाचाही नामोल्लेख पोलिसांनी केलेला नाही. केवळ ‘टूलकिट’च्या निर्मात्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर गुन्हा कायद्यांतर्गत कलम १२४ अ, १५३, १५३अ या कलमांखाली हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिस प्रवक्ते प्रवीर रंजन यांनी सांगितले. समाजमाध्यमांवरील किमान ३०० हून जास्त प्लॅटफॉर्मची ओळख पोलिसांनी पटविली आहे, ज्यात विदेशातून भारताच्या व सरकारच्या विरोधात द्वेषपूर्ण टिप्पण्या करण्यात येत आहेत. यात काही आंतरराष्ट्रीय संस्थांचाही सहभाग असल्याचे पोलिसांना आढळल्याचे रंजन यांनी सांगितले.