अमित शहांसाठी भाजप करणार घटनेत बदल?

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मे 2019

2012 मध्ये करण्यात आला होता घटनेत बदल

- 3 वर्षांचा असतो अध्यक्षपदाचा कार्यकाळ

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, अध्यक्षपदावर पुन्हा त्यांनाच संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कलम 21 या घटनेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो. 

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपला मोठे यश मिळाले. गांधीनगरमधून खासदार झालेल्या अमित शहा यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. असे असले तरीदेखील अमित शहा यांच्यासारखे नेतृत्त्व तूर्त पक्षाला मिळालेले नाही. त्यामुळे ही नवी व्यवस्था होईपर्यंत अमित शहा यांनाच या पदावर ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, अमित शहा यांनी केंद्रात मंत्रिपद घ्यावे यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षातील नेत्यांकडून सुरु आहेत. त्यामुळे मंत्रिपद मिळेपर्यंत तेच अध्यक्षपदावर राहतील, असे सांगितले जात आहे.

2012 मध्ये करण्यात आला होता घटनेत बदल

भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना 2012 मध्ये दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी भाजपच्या घटनेत बदल करण्यात आला होता. नितीन गडकरी यांच्यानंतर भाजपचा कोणताही सदस्य सलग दोनवेळा अध्यक्ष बनू शकतो. 

3 वर्षांचा असतो अध्यक्षपदाचा कार्यकाळ

भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा साधारणपणे 3 वर्षांचा असतो. मात्र, या घटनेत बदल केल्यानंतर यामध्ये वाढही दिली जाते. त्यामुळे आता पुन्हा अमित शहा यांना अध्यक्षपदी कायम ठेवायचे असेल तर पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Amit Shah Proposal for change in constitution of BJP party